ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आरोग्य कर्मचाऱ्यांचे योगदान अमूल्य; शासनाने तातडीने नियमितीकरण करावे : खा. धानोरकर

राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला खा. धानोरकर यांचा पाठिंबा

चांदा ब्लास्ट

राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती तसेच एकता संघटनेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे आपल्या न्याय्य मागण्यांसाठी ‘बेमुदत कामबंद’ आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या दि. १४/०३/२०२४ रोजीच्या निर्णयानुसार नियमित शासन सेवेत समायोजन व बदली धोरण, वेतनवाढ, ईपीएफ, आरोग्य व अपघात विमा आदी लागू करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला खासदार प्रतिभा धानोरकर यांनी भेट देऊन पत्राद्वारे आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला.

प्रतिभा धानोरकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “सार्वजनिक आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी अनेक वर्षांपासून अखंड सेवा बजावत आहेत. शासनाने या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे, यासाठी मी आमदार असताना सातत्याने प्रयत्न केले आहेत. कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्या विधानसभेत मांडल्या होत्या. विशेषतः १० वर्षांहून अधिक काळ सेवा बजावलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणासाठी मी सभागृहात ठाम आवाज उठवला होता. या पाठपुराव्यामुळेच सरकारने नियमितीकरणाचा आदेश जारी केला.”

त्या पुढे म्हणाल्या, “परंतु अत्यंत खेदाने सांगावे लागते की, आदेश असूनही परिचारिकांसह अनेक कर्मचाऱ्यांचे आजतागायत नियमितीकरण झालेले नाही. हे फक्त निराशाजनकच नाही, तर त्यांच्या निष्ठावंत परिश्रमांचा व योगदानाचा अवमान आहे.”

या लढ्यात कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन देत प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, “कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण हा त्यांचा हक्क आहे. या हक्कासाठी लढणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. तुमच्या या लढ्यात मी खंबीरपणे तुमच्या सोबत उभी आहे. तुमच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी मी पुन्हा एकदा संसदेत आणि केंद्र सरकारकडे ठोस पाठपुरावा करेन.” यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आंदोलन कर्त्यांना पाठिंब्याचे पत्र दिले.

आंदोलक कर्मचाऱ्यांनी शासनाने या विषयाकडे तातडीने लक्ष देऊन त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये