ताज्या घडामोडी

गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद मिरवणुकीमध्ये लेझर लाईट वापरास प्रतिबंध

पोलिस अधिक्षकांनी निर्गमित केले आदेश

चांदा ब्लास्ट

आगामी काळात जिल्ह्यात गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद हे सण साजरे केले जाणार आहे. या उत्सवाच्या मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने मानवी जिवीताला धोका, आरोग्याला, सुरक्षिततेला धोका तसेच जनतेमध्ये गोंधळ निर्माण होणे, तसेच भांडण निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिरवणुकीमध्ये लेझर लाईट वापरास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी निर्गमित केले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात 27 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव तसेच यादरम्यान ईद-ए-मिलाद हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. जिल्ह्यात सार्वजनिक गणेश मंडळाकडून वेगवेगळ्या तारखेला मुर्ती विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच ईद-ए-मिलादनिमित्त सुध्दा मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.

लेझर लाईटमुळे अंधत्व येणे, डोळे निकामी होणे, आरोग्याला धोका आणि गोंधळाची स्थिती निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1) अन्वये 27 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर 2025 या कालावधीत गणेशोत्सव व ईद – ए- मिलाद मिरवणुकीमध्ये लेझर लाईटच्या वापरास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे पोलिस अधिक्षकांच्या आदेशात नमुद आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये