ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स (HSRP) योजनेत महाराष्ट्रातील जनतेची लूट

केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचा आरोप

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स (HSRP) च्या अंमलबजावणीच्या नावाखाली महाराष्ट्रातील जनतेची सर्रास लूट होत असल्याचा गंभीर आरोप खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केला आहे. महाराष्ट्रात एचएसआरपीसाठी इतर राज्यांच्या तुलनेत दुप्पट शुल्क आकारले जात असताना , केंद्र सरकार याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचा दावा त्यांनी केला. या विषयावर त्यांनी लोकसभेत प्रश्न विचारून सरकारची पोलखोल केली आहे. मंत्रालयाने दिलेल्या उत्तरात, एचएसआरपीसह मोटार वाहन घटकांचे दर निश्चित करणे किंवा नियंत्रित करणे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत नाही, असे स्पष्ट केले आहे.

मंत्रालयाने दिलेल्या उत्तरात स्पष्ट झाले आहे की, एचएसआरपीसह मोटार वाहनांच्या घटकांचे दर निश्चित करणे किंवा नियंत्रित करणे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत नाही. तसेच, कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. हाच धागा पकडत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सरकारवर निशाणा साधला. “केंद्र सरकार नियमावली बनवून आपली जबाबदारी झटकत आहे,” असे त्या म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या, “देशात एकूण 40 कोटींहून अधिक नोंदणीकृत वाहने असून, त्यापैकी जवळपास 20 कोटी वाहनांवर एचएसआरपी बसवलेल्या नाहीत. महाराष्ट्रात तर हे प्रमाण 53.95% इतके चिंताजनक आहे. ग्रामीण भागातील जनतेला एचएसआरपी मिळवण्यासाठी मोठ्या अडचणी येत आहेत. एकीकडे शुल्क दुप्पट आकारले जाते आणि दुसरीकडे वितरण व्यवस्थापनातही गोंधळ आहे. सरकार यावर कोणतीही ठोस उपाययोजना करताना दिसत नाही.”

सक्षम अंमलबजावणी यंत्रणेअभावी ही संपूर्ण योजना फसली असून, सर्वसामान्य जनतेला केवळ त्रास सहन करावा लागत आहे. सरकारने या समस्येवर त्वरित लक्ष घालून महाराष्ट्रातील जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये