शेणगावात जिवती पोलिसांची अवैध दारू विक्रीविरुद्ध धडक कारवाई
दोघांवर गुन्हा दाखल, एकावर प्रतिबंधात्मक कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती : – जिवती पोलिसांनी अवैध दारू विक्रीविरुद्ध धडाकेबाज कारवाईचा सपाटा सुरू केला असून, शेणगाव येथे १८ ऑगस्ट रोजी मोठी कारवाई करण्यात आली. यात दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले, तर एकावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. मागील आठवड्यातही जिवती शहरात मोहफुलांच्या दारूविरुद्ध कारवाई करून सहा जणांवर गुन्हे दाखल झाले होते, त्यामुळे अवैध धंद्यांवर पोलिसांचा वचक बसला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक आणि उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिवती पोलिसांनी शेणगाव येथे विशेष मोहीम राबवली. सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक पोले, पोहवा गवाले मेजर, पोलिस कर्मचारी चेतन जाधव, किरण वाठोरे आणि महिला पोलिस कर्मचारी रजनी निखाडे यांनी गावात छापेमारी केली. यात देशी दारू, हातभट्टी मोहफुलांची दारू आणि सिंधी अशा तीन ठिकाणांवर छापे टाकण्यात आले.
या कारवाईत जप्त केलेला सिंधीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असून, जिवती पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपास सुरू असून, अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांचा कडक कारवाईचा इशारा आहे. या मोहिमेमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.