ॲड दीपक चटप यांची महाराष्ट्र राज्य युवा आघाडी प्रदेशाध्यक्षपदी निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
शेतकरी संघटनेच्या सातत्यपूर्ण लढ्यातून उभा राहिलेला निर्भीड आवाज, शेतकरी चळवळीशी नाळ जुळवून घेणारा तरुण नेता, ॲड दीपक चटप* यांची महाराष्ट्र राज्य युवा आघाडी प्रदेशाध्यक्षपदी झालेली निवड ही केवळ वैयक्तिक गौरवाची बाब नसून राज्यातील असंख्य शेतकरी कुटुंबांच्या आशेचा किरण आहे. शेतमालाला न्याय्य दर, कर्जमुक्ती, शेतीसाठी, रोजगारासाठी पाणी व वीज यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर सातत्याने संघर्ष करणाऱ्या संघटनेला आता एक तरुण, कायद्याची जाण असलेला, लढवय्या नेतृत्वाचा चेहरा मिळाला आहे.
आज शेतकऱ्यांच्या आंदोलनांना केवळ घोषणांची नव्हे तर धोरणांना सामोरे जाणाऱ्या तरुण रक्ताची गरज आहे. न्यायालयीन पातळीवर, प्रशासकीय पातळीवर आणि रस्त्यावर संघर्ष करताना शेतकरी हिताचे प्रश्न धारदारपणे मांडण्याची ताकद ऍड. चटप यांच्याकडे आहे. हाच विश्वास त्यांच्या निवडीमागे दिसून येतो.
त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील शेतकरी युवकांना संघटित करण्याचे आव्हान उभे आहे. परंतु ही जबाबदारी ते प्रामाणिकपणे पार पाडतील, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. कारण संघटना पदव्या किंवा गौरवासाठी नसतात, तर शेतकऱ्यांच्या डोळ्यातील आसवांचे उत्तरदायित्व वाहण्यासाठी असतात.