चांदा पब्लिक स्कूल येथे नंदी सजावट स्पर्धेचे आयोजन

चांदा ब्लास्ट
पोळा हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. वर्षभर बैल शेतात राबतात, त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी त्यांना कामापासुन सुट्टी देऊन त्यांची रंगरंगोटी करून त्यांना सजवले जाते व खुप उत्साहाने हा सण साजरा केला जातो. हीच प्राण्याविषयी कृतज्ञता व आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी याकरीता चांदा पब्लिक स्कूल येथे नंदी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरूवात प्रमुख अतिथी शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जीवतोडे आणि प्राचार्या सौ. आम्रपाली पडोळे व परीक्षक सौ. पुजा मिश्रा, सौ. दुर्गा जोरगेवार, सौ. सुरेखा उमरे यांच्या हस्ते बैलजोडीची पूजा करून करण्यात आली. स्पर्धेत मुलांनी आपल्या कल्पकतेप्रमाणे आपल्या नंदीची सजावट करून मार्गदर्शनपर संदेश पोहचविण्याचा प्रयत्न केला. त्यात विद्यार्थी शेतकरी वेशभूषेमध्ये अगदी शोभून दिसत होते. यात पालकांचे मोलाचे योगदान दिसुन आले.
चांदा पब्लिक स्कूलच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे यांनी चिमुकल्यांचे भरभरून कौतुक केले व मुलांना मुक प्राण्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा संदेश दिला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. आम्रपाली पडोळे यांनी स्पर्धेत सहभागी होणा-या सर्व चिमुकल्यांना प्रोत्साहित केले.
ही स्पर्धा पुर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ. शिल्पा खांडरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका मनिषा नागोशे तर आभार प्रदर्शन रिना शाह यांनी केले. कार्यक्रम यशस्विरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.