त्या फलकाच्या सुधारणाकडे दुर्लक्षच!
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने द्यावे लक्ष; नवीन प्रवाशांची होते फसगत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना – नवनिर्मित राजुरा – आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ बी वर अनेक ठिकाणी गाव माहिती फलक लावण्यात आले आहे. परंतु यातील काही फलक चुकीची माहिती देत असल्याने प्रवाशांची दिशाभूल होत आहे. या फलकाची सुधारणा करण्यात यावी अशी मागणी होत आहे. परंतु त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे.
यात काही फलकावर हिंदी आद्य अक्षरातील शब्दात चुका आहे. यात हरदोना चे हरडोना, नैतामगुडा चे नेतामगुडा, कुसळ चे कुशल, माथा चे माठा, कातलाबोडी चे कातळाबोडी, कन्हाळगाव चे कन्हालगाव असे शब्द झाले आहे. इंजापूर फाट्यावर बेलगाव, रामपूर फाट्यावर झुलबर्डी, लालगुडा फाट्यावर नांदाफाटा, देवघाट रिठ फाट्यावर कुसळ, चनई खुर्द फाट्यावर चन्नई बुद्रुक, दत्त मंदिर समोर ऐवजी लोणी पानंद रस्त्याजवळ गणेशमोड रीठ असे चुकीचे फलक लावण्यात आले आहे. त्यामुळे नवीन प्रवाशाची दिशाभूल होत आहे. या दृष्टीने फलकांची सुधारणा होणे अत्यंत गरजेची आहे.
त्या गाव फाट्यावर अजून फलकच नाही
राष्ट्रीय महामार्गावरील वनसडी येथील उडान पुलाच्या उत्तर बाजूला पारंबा रिठ फाटा, दक्षिण बाजूला दहेगाव रिठ फाटा, पिपडा फाटा, देवघाट रिठ फाटा, गणेशमोड रिठ फाटा, धोपटाळा फाटा, अकोला फाटा, रुपापेठ फाटा, कोठोडा बूज फाटा, परसोडा फाटा फलक लावण्यात आले नाही. त्यामुळे ती गावे नेमके कुठे गेली असे म्हणण्याची वेळ नवीन प्रवाशावर आली आहे. याच बरोबर गावाच्या नावाची फलके रस्त्याच्या दोन्ही बाजूला नसल्याने गाव गेले तरी कळत नाही. त्यामुळे दोन्ही बाजूंनी गाव फलक लावण्याची गरज आहे.
पारडी येथे मुकुटबन दिशा निर्देशन नाही.
पारडी येथून मुकुटबन शहराकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग आहे. परंतु राष्ट्रीय महामार्गावरील फलकात मुकुटबन चे नाव लिहून दिशा निर्देशन दाखवण्यात आले नाही. त्यामुळे हा कमी अंतराचा मार्गाची माहिती नवीन व्यक्तींना कळत नाही.
उडान पुलाची रंगरंगोटी व सौंदर्यकरण केव्हा होणार
कोरपना तालुक्यातील पारडी, कोरपना, नारंडा फाटा येथे नव्याने उडान पूल निर्माण झाले आहे. परंतु पुलाची अजून रंगरंगोटी काम, तुला खाली सौंदर्यकरण, वृक्ष लागवड काम अद्यापही रेंगाळूनच पडले आहे. त्यामुळे पुलाच्या सौंदर्याला नख लागत आहे.
पूल बनली गैरकृत्याचा अड्डा
तिन्ही नवनिर्मित पुलावर दिवस रात्र तरुणाईचा गोळका राहतो. या पुलावरच बर्थडे सेलिब्रेशन, व्यायाम सारखे प्रकार केले जातात. याच बरोबर तळीराम मंडळी एक एक घोट मध्याचे येथेच चढवत असल्याने काचेच्या बाटल्याचे ढीग पसरत चालले आहे. त्यामुळे शहराचे सौंदर्य वाढवणारे उड्डाणपूल विद्रुप होण्याची भीती व्यक्त होत आहे. यावर पोलीस विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.