जिवती शहरातील स्वच्छतेची दुरवस्था: नाल्यांची घाण आणि सार्वजनिक शौचालयांची दयनीय अवस्था
नगर पंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती : – स्वच्छ भारत अभियानाला हरताळ फासणारी परिस्थिती जिवती शहरात उद्भवली आहे. शहरातील नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे, तर सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून नगरपंचायत प्रशासना विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
शहरातील बहुतांश नाल्या कचरा आणि गाळाने तुडुंब भरल्या असून, पावसाळ्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. नाल्यांमधून पसरणारी दुर्गंधी आणि वाढता डासांचा प्रादुर्भाव यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. दुसरीकडे, सार्वजनिक शौचालयांमध्ये स्वच्छतेच्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे.
तुटलेली दरवाजे, गळणारे नळ आणि अस्वच्छता यामुळे शौचालये वापरणे अशक्य झाले आहे. विशेषतः महिला आणि मुलींसाठी ही परिस्थिती असुरक्षित आणि अस्वस्थताजनक बनली आहे.स्थानिक नागरिकांनी नगरपंचायतीच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत कोट्यवधी रुपये खर्च होत असताना प्रत्यक्षात कोणतीही सुधारणा दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. प्रशासन केवळ कागदोपत्री स्वच्छता दाखवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
शहरातील नाल्यांची नियमित साफसफाई, सार्वजनिक शौचालयांची तातडीने दुरुस्ती आणि स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने ठोस पावले उचलली नाहीत, तर जिवती शहरातील स्वच्छतेची परिस्थिती आणखी बिकट होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.