आ. सुधीर मुनगंटीवार यांची ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ सन्मानासाठी निवड
‘लोकमत’तर्फे लंडन येथे होणार आ. मुनगंटीवार यांचा गौरव

चांदा ब्लास्ट
१८ ऑगस्टला ‘ग्लोबल इकॉनामिक कन्व्हेन्शन’चे आयोजन
चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
चंद्रपूर – राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनमधून भारतात आणणण्याचे ऐतिहासिक कार्य करणारे आ. श्री. मुनगंटीवार यांना त्याच लंडनच्या भूमिमध्ये ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. ‘लोकमत’च्या वतीने सोमवार दि. १८ ऑगस्ट रोजी लंडन येथे आयोजित ‘ग्लोबल इकॉनामिक कन्व्हेन्शन’मध्ये आ. श्री. मुनगंटीवार यांना हा सन्मान बहाल करण्यात येईल.
‘लोकमत’च्या ‘ग्लोबल इकॉनामिक कन्व्हेन्शन’ या प्रतिष्ठित सोहळ्याचे हे दुसरे वर्ष असून, गेल्या वर्षीं हा सोहळा सिंगापूर येथे झाला होता. या वर्षी लंडनमध्ये होणाऱ्या या कन्व्हेन्शनमध्ये भारताच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने होणाऱ्या प्रगतीवर चर्चा होणार आहे. भारताच्या आर्थिक धोरणांचे विश्लेषण, जागतिक व्यापारातील भूमिका, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधांचा विकास आणि हरित ऊर्जा यांसारख्या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे.
या सोहळ्यात ‘कोहिनूर ऑफ इंडिया’, ‘भारत भूषण’, ‘महाराष्ट्र रत्न’, ‘ग्लोबल सखी’ आणि ‘गुजरात रत्न’ अशा प्रतिष्ठित पुरस्कारांनी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे. हे पुरस्कार त्यांच्या कार्याची जागतिक पातळीवर दखल घेण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी दिले जाणार आहेत.
आ. श्री. मुनगंटीवार यांना राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी ‘लोकमत कोहिनूर ऑफ इंडिया’ हा जाहीर करण्यात आला.‘देशाच्या विकास आणि प्रगतीमध्ये दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल आपले मनःपूर्वक आभार. या जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित व्यासपीठावर आपल्या विलक्षण कार्याचा उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत,’ असे पत्र आ. श्री. मुनगंटीवार यांना ‘लोकमत’ माध्यम समूहाचे चेअरमन श्री. विजय दर्डा यांच्याकडून प्राप्त झाले आहे.
आ. श्री. मुनगंटीवार यांना यापूर्वी देखील अनेक पुरस्कार व सन्मान बहाल करून गौरविण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांना गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने मानाची डी.लिट. प्रदान करण्यात आली. पर्यावरण व वन्यजीव तसेच संस्कृती व ऐतिहासिक वारसा संवर्धन क्षेत्रात आ. श्री. मुनगंटीवार यांनी दिलेल्या योगदानासाठी ही डी.लिट. प्रदान करण्यात आली. गोंडवाना विद्यापीठ स्थापन व्हावे यासाठी आ. श्री. मुनगंटीवार यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्याच विद्यापीठातर्फे डी.लिट. जाहीर होणे हा देखील एक विलक्षण योगायोग ठरला.
१९९९ मध्ये राष्ट्रकुल संसदिय मंडळाच्या वतीने विधानसभेतील उत्कृष्ट आमदार, २००८ मध्ये अंध कल्याणाच्या क्षेत्रात उल्लेखनिय काम केल्याबद्दल राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या वतीने जी.एल. नर्डेकर स्मृती पुरस्कार, वृक्षारोपण मोहीमेच्या संदर्भात किर्लोस्कर वसुंधरा अवार्ड, लोकसेवा आणि विकास संस्थेचा कर्मवीर मासा कन्नमवार मेमोरियल अवार्ड, दैनिक लोकमतचा महाराष्ट्रीयन ऑफ द इयर, इंडिया टूडे समुहाद्वारा दोन वेळा बेस्ट फायनान्स मिनिस्टर पुरस्कार, आफ्टरनुन व्हॉइस या संस्थेद्वारे बेस्ट परफॉर्मिंग मिनिस्टर पुरस्कार, जे.सी.आय. महाराष्ट्र तर्फे मॅन ऑफ द इयर पुरस्कार, फेम इंडिया तर्फे उत्कृष्ट मंत्री पुरस्कार अशा प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मंत्री पदाच्या कार्यकाळात ४ लिम्का रेकॉर्डसह ‘सियावर रामचंद्र की जय’ ही अक्षररचना व ‘ग्रीन भारतमाता’ साकारण्यासाठी २ गिनेस बुक ऑफ रेकॉर्ड मिळाले, विक्रमी वृक्षलागवडीसाठी देशगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये विशेष उल्लेख केला, तसेच त्यांच्या कार्यालयाला देशातील पहिला आयएसओ दर्जा प्राप्त झाला. वित्तमंत्री म्हणून त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी ‘आज तक’ व ‘इंडिया टुडे’ने त्यांना ‘बेस्ट फायनान्स मिनिस्टर इन इंडिया’ म्हणून गौरविले, स्व. अरुण जेटली यांच्या हस्ते सन्मानित केले गेले. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ११,९७५ कोटी रुपयांचा महसुली आधिक्य असलेला ऐतिहासिक अर्थसंकल्प त्यांनी सादर करून देशात अभूतपूर्व नोंद केली.