ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर मनपा आयुक्त व उपायुक्तांची जपानभेटीसाठी निवड

नागरी सुविधांची पाहणी व अभ्यासदौरा

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागामार्फत Advanced Post Graduate Diploma in Urban Management (APGDUM) या पदव्युत्तर अभ्यासक्रमांतर्गत 19 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट 2025 या कालावधीत जपान येथे परदेशी अभ्यासदौरा आयोजित करण्यात आला आहे. या अभ्यासदौऱ्यास 14 ऑगस्ट 2025 रोजी शासनमान्यता देण्यात आली चंद्रपूर मनपा आयुक्त विपीन पालीवाल व उपायुक्त मंगेश खवले यात सहभागी होणार आहेत.

   या अभ्यासदौऱ्यात राज्यातील विविध नगररचना विभाग, महानगरपालिका व शहरी विकास क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी सहभागी होत असुन जपानमधील शहरी विकास, स्थानिक स्वराज्य व्यवस्था व आधुनिक नागरी सेवांचा प्रत्यक्ष अनुभव घेणार आहेत.या दौऱ्याचे आयोजन पुण्यातील Association of Friends of Japan (AFJ) या संस्थेमार्फत करण्यात आले असून यशदा, पुणे यांचे शैक्षणिक मार्गदर्शन लाभले आहे.

दौऱ्याचा उद्देश –

या परदेशी अभ्यासदौऱ्याचा प्रमुख उद्देश म्हणजे जपानसारख्या प्रगत देशातील शहरी प्रशासन व व्यवस्थापन पद्धतींचा अभ्यास करून महाराष्ट्रातील शहरी विकास कार्य अधिक सक्षम, शाश्वत व नागरिकाभिमुख बनवणे हा आहे. जपानमधील कचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया, वाहतूक नियोजन, आपत्ती व्यवस्थापन, हरित विकास, सांस्कृतिक वारसा जतन या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय अनुभव आत्मसात करून त्यांचा महाराष्ट्रातील शहरी प्रशासनात उपयोग करण्याची संधी या दौऱ्यातून मिळणार आहे. तसेच, शहरी समस्यांच्या सोडवणुकीसाठी तंत्रज्ञानाचा वापर, शाश्वत विकासाचे मॉडेल, नागरिकांच्या सहभागावर आधारित शासनव्यवस्था, व पर्यावरणपूरक प्रकल्प राबविण्याच्या पद्धतींचा अभ्यास या अभ्यासदौऱ्याचा भाग असेल.

दौऱ्याची ठळक वैशिष्ट्ये –

टोकियोतील आसाकुसा व सेन्सो-जी मंदिर भेट, शहरी नियोजन व पर्यटन विकासाचा अभ्यास.

नारा पार्क व क्योटो (किंकाकुजी) येथे सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा संवर्धनाची पाहणी.

ओसाका किल्ला व शिंबाशी येथे शहरी प्रशासनाशी संबंधित चर्चासत्रे.

शिराहामा येथील कचरा व्यवस्थापन व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प भेट.

स्थानिक स्वराज्य संस्था अधिकारी व जपानमधील तज्ञांशी चर्चा.

चंद्रपूर शहराला होणारा फायदा –

या परदेशी अभ्यासदौऱ्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेच्या आयुक्त व उपआयुक्तांना जपानमधील अत्याधुनिक शहरी विकास अनुभवण्याची संधी मिळणार आहे. तेथील सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास करून चंद्रपूर शहरात स्वच्छता व्यवस्थापन, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, पर्यावरणपूरक प्रकल्प आणि नागरिकाभिमुख सेवांच्या उन्नतीसाठी त्याचा थेट उपयोग होईल.

या अभ्यासदौऱ्यामुळे चंद्रपूर शहराचा शाश्वत विकास, पर्यावरण संरक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नागरिकांच्या जीवनमान उन्नतीसाठी सकारात्मक दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये