संस्कार भारती चंद्रपूरच्या कृष्णरंग या कृष्णगीतांच्या मैफिलीने श्रोत्यांना केले मंत्रमुग्ध

चांदा ब्लास्ट
श्री गोकुळाष्टमीनिमित्त चंद्रपूरातील भानापेठ वॉर्डातील गोपालकृष्ण मंदिर परिसरात संस्कार भारती चंद्रपूरच्या गायक व वादक कलावंतांनी कृष्णगीतांची सुरेल मैफिल सजवत उपस्थित श्रोत्यांना कृष्णभक्तीच्या धारांमध्ये चिंब भिजवले. कृष्णरंग ही मैफिल एकाहून एक सरस आणि सुरेल गीतांनी उत्तरोत्तर रंगली.
मंगेश देऊरकर यांनी गायलेल्या सुर निरागस हो या गणेश आराधनेने मैफिलीला दमदार सुरुवात झाली. बाई मी विकत घेतला शाम हे गीत प्रणाली पांडे यांनी गायले. बडा नटखट है हे चित्रगीत मुक्ता बोझावार यांनी गायले. ओ पालन हारे ही लगान चित्रपटातील प्रार्थना चमुने सामूहिक रित्या गायली. बाई माझी करंगळी मोडली या नीता उत्तरवार यांनी गायलेल्या गीताला श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद मिळाली. जुबीन नौटीयाल यांचे हरे कृष्ण हरे रामा हे गीत सार्थक यांनी तर बनवारी रे हे गीत भावना हस्तक यांनी गायले. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे गीत प्राजक्ता उपरकर यांनी गायले. ठुमक ठुमक, एक राधा एक मीरा, दही दूध लोणी, नंदकिशोरा चित्त चकोरा,
आज गोकुळात रंग खेळतो हरी, जग मे सुंदर है वो नाम, हरी म्हणा कुणी गोविंद, घागर घेऊन निघाली, राधा ही बावरी, उधळीत येरे गुलाल, श्याम तेरी बंसी पुकारे राधा नामवृंदावनी वेणु या गीतांनी मैफिल रंगली. हे रे कन्हय्या हे गीत लिलेश बरदाळकर यांनी गायले. आशिष बाला यांच्या गीताने देखील रसिक मनाचा वेध घेतला. विशेष म्हणजे आचार्य मनीष महाराज मैफिलीला उपस्थित राहिले आणि त्यांनीही दोन कृष्णगीते सादर केली.
मैफिलीच्या शेवटी झालेल्या सामूहिक कृष्णजन्म गजराने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. गरबा पॅरोडीच्या तालावर आयोजक व श्रोत्यांनी फेर धरत नृत्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष संध्या विरमलवार यांनी केले, यावेळी त्यांनी गोपालकृष्ण देवस्थान च्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. मैफिलीचे निवेदन रेवती बडकेलवार यांनी केले. सिंथेसायजर वर निखिल झिरकुंटवार, तबल्यावर अमोल दूधलकर यांनी साथ दिली. व्हायोलीन वर जयंत देऊरकर यांनी साथ संगत केली.
या मैफिलीनंतर श्रीकृष्णाची आरती झाली. रात्री बारा वाजता कृष्णजन्म साजरा झाला. या आयोजनासाठी श्री राजदेरकर, राजेश्वर सुरावार यांनी संस्कार भारतीच्या चमुला सर्वतोपरी सहकार्य केले.