५० क्षयरुग्णांना सहा महिन्यांसाठी घेतले दत्तक
घुग्घुस येथील राजीव रतन केंद्रीय चिकित्सालयाचा पुढाकार

चांदा ब्लास्ट
आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालय दिल्ली तर्फे राष्ट्रीय धोरणात्मक योजनेअंतर्गत २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त भारत हे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत ‘प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत’ अभियानाअंतर्गत राजीव रतन केंद्रीय चिकित्सालय घुग्घुस यांनी ५० गरजू क्षयरुग्णांना सहा महिन्यांकरीता दत्तक घेतले आहे व त्यांना पोषण आहार किट देऊन क्षयरुग्णांची मदत केली.
प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान उपक्रमाचे उद्दिष्ट साध्य करण्याकरीता सामाजिक, कॅापोरेट, शैक्षणिक संस्था, दानशुर व्यक्तींनी क्षय रुग्णांना पोषण आहार किट देऊन नि:क्षय मित्र बनून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वेकोलिच्या एरिया जनरल मॅनेजर सभ्यासाची डे, दामिनी महिला मंडळच्या अध्यक्षा अनिता डे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललीतकुमार पटले, क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. सी. आनंद, वैद्यकिय अधिकारी डॉ विरेन्द्र शंभरकर, डॉ. सुवर्णा मानकर, राजीव रतन केंद्रिय चिकित्सालयाचे औषध निर्माण अधिकारी सुधीर गुंडेलीवार, डॉ. प्रिती राजागोपाल, जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. तेजस्विनी ताकसांडे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललीतकुमार पटले म्हणाले, दानशुरांकडून केलेल्या छोटयाशा मदतीने क्षयरुग्ण बरा होण्यास मदत होते. समाजातील दानशुर व्यक्तींनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.