सर्वांच्या सहकार्यातून ‘हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करा – प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे

चांदा ब्लास्ट
तिरंगा हा प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचे प्रतीक असून भारताच्या ऐक्य व विविधतेत एकतेचे दर्शन घडविणारा आहे. नागरिकांमध्ये राष्ट्राभिमान, देशभक्ती आणि राष्ट्रीय ध्वजाविषयी आदर निर्माण करण्याच्या उद्देशाने शासनामार्फत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियानात समग्र सहभागातून यशस्वी करावे असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितिन व्यवहारे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकी ते बोलत होते, यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त विपीन पालिवाल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक ईश्वर कातकाडे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिना साळूंके, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, शिक्षणाधिकारी अश्विनी केळकर यांसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रभारी जिल्हाधिकारी श्री. व्यवहारे म्हणाले, अभियानाअंतर्गत प्रत्येक घर, शाळा, कार्यालय, संस्था, व्यापारी प्रतिष्ठाने यांनी ध्वज फडकवावा. देशभक्तीपर गीत, ध्वजसन्मान सोहळे, निबंध, चित्रकला व घोषवाक्य स्पर्धा आयोजित कराव्यात. नागरिकांनी ध्वजासह छायाचित्रे/व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करावीत. ग्रामपंचायत, नगरपालिका, स्वयंसेवी संस्था, महाविद्यालये व सांस्कृतिक गटांचा सक्रिय सहभाग असावा. प्रभात फेरी, सायकल रॅली, सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर प्रदर्शने आयोजित करावीत तसेच नागरिकांमध्ये राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान राखण्याची सवय जोपासावी.
प्रत्येक विभागाने आपल्या स्तरावर प्रसारकार्य करावे, अभियानातील उपक्रमांचे फोटो शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करावेत. शासकीय कार्यालये, धरणे व ऐतिहासिक स्थळांवर तिरंगा स्वरूपातील विद्युत रोषणाई करावी, जेणेकरून नागरिकांना प्रेरणा मिळेल. तिरंगा ध्वज सहज उपलब्ध करून देऊन नागरिकांना सहभागासाठी प्रोत्साहित करावे, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, स्वयंसेवी संस्था व नागरिकांनी उत्साहपूर्वक सहभाग नोंदवून ‘हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करण्याचे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी केले आहे.