कोरपना येथील उड्डाण पुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथे नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाण पुलाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी परिसरातील फुले-आंबेडकरवादी संघटना आणि नागरिकांनी केली आहे. या मागणीसाठी ११ ऑगस्ट २०२५ रोजी निवासी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन सादर करण्यात आले. तसेच, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) च्या चंद्रपूर येथील प्रकल्प संचालकांनाही हे निवेदन देण्यात आले आहे. या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून, वाहतुकीसाठी तो खुला करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ही मागणी अधिक तीव्र झाली आहे.
कोरपना येथील हा उड्डाण पूल महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांना जोडणारा महत्वपूर्ण दुवा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात तेलंगणा हा प्रदेश निजाम राज्य म्हणून ओळखला जायचा. या प्रदेशाला भारतीय संघराज्यात समाविष्ट करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अमूल्य योगदान होते. त्यामुळे या पुलाला संविधान निर्माते डॉ. आंबेडकर यांचे नाव देणे हा त्यांच्या कार्याचा सन्मान ठरेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, सध्या भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू असल्याने या मागणीला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. “संविधानाचे रक्षण आणि प्रचार करण्यासाठी अशा प्रकारच्या स्मृती चिन्हांची गरज आहे,” असे संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
या मागणीमागे परिसरातील विविध फुले-आंबेडकरवादी संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते सक्रिय आहेत.
निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सोमाजी गोंडाने, शिक्षक संघटनेचे राजू मेश्राम, तालुका सल्लागार मधुकर चुनारकर, भीम आर्मीचे मदन बोरकर, विजय जीवने, कोरपनाचे नगरसेवक मनोहर चन्ने, शौकत अली, आदिवासी नेते प्रभाकर गेडाम, ओबीसी नेते हरिदास गौरकार, शुद्धधन भगत, बौद्धाचार्य श्रावण जीवने, बादल चांदेकर यांसह अनेकांच्या सह्या आहेत. या नेत्यांनी एकत्र येऊन ही मागणी पुढे रेटली आहे.