ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा : नागरिकांची तीव्र मागणी

लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर : नगरपालिकेचे दुर्लक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           शहरातील विविध भागांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासामुळे नागरिक त्रस्त झाले असून, नगर परिषदेकडे तात्काळ कारवाईची मागणी जोर धरत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील परिसर, जैन मंदिर रोड, मनोज कांच भंडार इत्यादी ठिकाणी दिवसभर या भटक्या कुत्र्यांचे साम्राज्य पाहावयास मिळत आहे. हे कुत्रे दुकानदारांच्या दुकानात शिरून लघवी करतात, माल खराब करतात आणि ग्राहकांवर धावून जात असल्याने व्यापाऱ्यांचीही मोठी गैरसोय होत आहे.

सदर कुत्र्यांचा उपद्रव केवळ दिवसा सीमित नसून रात्रीच्या वेळी त्यांचा भुंकण्याचा आवाज इतका त्रासदायक असतो की नागरिकांना झोपही होत नाही. विशेषत: लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत आहे. अनेकदा या कुत्र्यांकडून हल्ले होण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली जीवन जगत आहेत.

शहरातील सफाई, कचरा व्यवस्थापन आणि भाजीपाला तसेच मांसाच्या दुकानांच्या उघड्यावर फेकल्या जाणाऱ्या अवशेषांमुळे भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे लक्षात येत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कुत्र्यांचे स्टेरिलायझेशन राबविणे, शहरातील मांस व भाजी मार्केट परिसर स्वच्छ ठेवणे आणि कुत्र्यांना अन्न मिळण्याचे स्रोत बंद करणे महत्त्वाचे आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नगर परिषद भद्रावतीकडे तात्काळ भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करून पशुधन विभागाच्या माध्यमातून पकड मोहीम, लसीकरण व निर्जंतुकीकरण करण्याची मागणी केली आहे. सदर मोहिमेस तातडीने सुरुवात न झाल्यास नागरिकांकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात येत असून सुरक्षित व स्वच्छ भद्रावतीसाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये