ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अम्मा चौक स्मारकाची पुरातत्त्व विभागाकडे तक्रार 

परवानगी देणाऱ्या महानगरपालिकेवर कारवाई करण्याची मागणी 

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : शहर पोलीस स्टेशन व सात मजली इमारतीच्या मधोमध असलेल्या जागेवर चंद्रपूर महानगरपालिकेने कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अम्मा चौक स्मारकाचे बांधकाम सुरू होते. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी पुरातत्त्व विभागाकडे लेखी निवेदन सादर करीत परवानगी देणाऱ्या महानगरपालिकेची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

गांधी चौक परिसराची ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेता, येथे भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार कोणतेही काम करता येत नाही, असे असताना देखील केवळ आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्रींच्या नावे स्मारक उभारण्याचा प्रकार सुरू होता. हे काम १९५८ च्या भारतीय पुरातत्त्व अधिनियमाचे उल्लंघन असून, तातडीने हे बांधकाम थांबवावे व चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. तसेच, याठिकाणी भारतीय पुरातत्त्व विभागाची अधिसूचना लावण्यात यावी, अशी मागणी रितेश तिवारी यांनी केली आहे.

 चंद्रपूरमधील अनेक स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक, माजी लोकप्रतिनिधींनी मोठे योगदान दिले आहे, मात्र त्यांना कधीही स्मारक वा गौरव मिळाला नाही. मात्र टोपल्या विकणाऱ्या एका महिलेसाठी स्मारक उभारण्याचा निर्णय हा पक्षपाती आणि चुकीचा असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

या संपूर्ण प्रकरणावर महानगरपालिकेने तातडीने खुलासा करावा व या बांधकामाची परवानगी देणाऱ्या महानगरपालिकेवर पुरातत्त्व विभागा कडून कारवाई करावी, अन्यथा काँग्रेस पक्षाकडून जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही तिवारी यांनी दिला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये