वृक्षदिंडीने दुमदुमली घुग्घुस नगरी

चांदा ब्लास्ट
घुग्घुस : श्री साईंबाबा ग्रामीण विकास संस्था, गडचिरोली अंतर्गत प्रियदर्शिनी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, घुग्घुस ता. जि. चंद्रपूर यांच्या वतीने भव्य वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले. या वृक्षदिंडीने घुग्घुस शहरात पर्यावरण जागरुकतेचा संदेश देत जनजागृती केली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापिका सौ. अनु चोथे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून नगर परिषद घुग्घुसचे प्रवीण धोंगडे, केंद्र प्रमुख अनिल दा, पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.
यावेळी वृक्षदिंडीची महत्त्व पटवून देत परिसरात वृक्षारोपणाची गरज स्पष्ट केली. नंतर वृक्षदिंडी गांधी चौक, आठवडी बाजार, गांधी चौक मार्गे निघाली. बँड पथकाच्या सळसळत्या तालावर विद्यार्थीनींनी “वृक्ष लावा, जीवन वाचवा” असे घोषवाक्य दिले.
या वृक्षदिंडीत बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, घुग्घुस पुलिस स्टेशन परिसर व इतर ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत वृक्षदिंडीचे स्वागत केले व विद्यार्थ्यांना पाणी व लाडू वाटप केले.
कार्यक्रमाचे संचालन बलवंत विखार यांनी केले. आभार प्रदर्शन कु. सोनाली कांबळे हिने मानले.