जिवती तालुक्यातील १४ गावांचे सीमांकन तात्काळ पूर्ण करून महाराष्ट्रात समावेश करा
जिवती तालुक्यातील ८६४९ हेक्टर क्षेत्राला वनक्षेत्रातून वगळण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाची दिल्लीत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट
जिवती :- चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील १४ गावांच्या सीमांकन आणि भूमी अभिलेखाचा अनेक दशकापासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिल्ली येथे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन या गंभीर विषयावर चर्चा केली. १९९७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या बाजूने निकाल दिला असला, तरी या गावांची अधिकृत सीमांकन प्रक्रिया अजूनही पूर्ण झाली नाही, हे त्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला समन्वय साधून यावर तातडीने उपाययोजना करण्याची विनंती केली. या भेटीत, मंत्र्यांनी यावर लवकरच सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यामुळे या गावांच्या विकासाचा आणि गावकऱ्यांच्या हक्कांचा मार्ग मोकळा होणार आहे.
यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिवती तालुक्यातील ८६४९.८०९ हेक्टर क्षेत्राला वादग्रस्त वनक्षेत्रातून वगळण्याची मागणी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चुकीच्या नोंदींमुळे वनक्षेत्र म्हणून गणल्या गेलेल्या या जमिनींमुळे शेतकरी आणि स्थानिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या संदर्भात, उप वनसंरक्षक आणि तहसीलदारांच्या संयुक्त अहवालानुसार हे क्षेत्र वनक्षेत्र नसल्याचे सिद्ध झाले आहे, तरीही हा प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचणी येत आहेत.
तसेच यावेळी १४ गावांच्या प्रश्न तसेच वनजमिनी प्रश्न संदर्भातील अडचणी केंद्र सरकारच्या स्तरावरच सोडविल्या जाऊ शकत असल्यामुळे, केंद्राने या प्रश्नांमध्ये हस्तक्षेप करून ते तात्काळ निकाली लावण्याची आग्रहाची विनंती खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली.
याप्रसंगी मंत्री महोदयांनी दोन्ही गंभीर विषयांवर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. या बैठकीत जिवती येथील काँग्रेस नेते सुग्रीव गोतावळे, तिरुपती पोले, सीताराम मडावी, दत्ता गायकवाड, चंद्रकांत बिऱ्हाडे आणि बंडू राठोड यांचीही उपस्थिती होती. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या या प्रयत्नांमुळे दोन्ही प्रश्नांवर लवकरच सकारात्मक तोडगा निघेल, अशी आशा व्यक्त केली.