ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोळसा वाहतुक रेल्वे लाईनकरिता जमिनीचे अधिग्रहण स्वतः वेकोलिने करावे – हंसराज अहीर

कढोली, मानोली, गोवरी येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची भेट

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : वेकोली बल्लारपूर क्षेत्रांतर्गत, कोळसा वाहतुकीकरिता, बाबुपेठ-सास्ती बी.जी. रेल्वे लाईन उभारणीसाठी, राजुरा तालुक्यातील, कढोली, मानोली, गोवरी या गावातील शेतजमिनी अधिग्रहीत करण्यात येणार आहेत. या अधिग्रहणामुळे भविष्यात अनेक ज्वलंत प्रश्न, समस्या व अडचणी उद्भवणार असल्याने या समस्यांचे निराकरण नोकरी व स्थानिकांना रोजगार तसेच अधिग्रहीत शेतजमिनीला वाजवी वाढीव दर मिळण्याकरिता संबंधित शेतकऱ्यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांना विविध मागण्या अंतर्भुत असणारे निवेदन सादर केले.

            दि. 02 ऑगस्ट 2025 रोजी हंसराज अहीर यांच्या जनसंपर्क कार्यालयास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य राकेश हिंगाणे, रामपूर ग्रा.पं. माजी सरपंच रमेश कुडे व विठोबाजी हिंगाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत इतर मागास प्रवर्ग व अन्य प्रवर्गातील शेतकऱ्यांनी भेट देवून हंसराज अहीर यांचेशी सविस्तर चर्चा करून या मागण्यांविषयी न्याय मिळवून देण्याची मागणी केली. सदर अधिग्रहण वेकोलिने सी.बी. अॅक्ट 1957 नुसार करावे अशी मागणीही संबंधित शेतकऱ्यांनी अहीर यांचेकडे केली.

            सदर मागणी रास्त व न्यायपूर्ण असल्याचे सांगत आयोगाचे अध्यक्ष अहीर यांनी यापूर्वी वेकोलि प्रबंधनाने गोयेगाव रेल्वे सायडिंग व अन्य ठिकाणी स्वतः जमिनीचे अधिग्रहण करून प्रकल्प निर्माणासाठी जमीन रेल्वे विभागास सुपूर्द केली होती. त्याचप्रमाणे या प्रकल्पात सुद्धा वेकोलीने अधिग्रहण करावे ज्यामुळे शेतकऱ्यांना रोजगार मिळेल तसेच या रेल्वे लाईनमुळे शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी दोन भागांमध्ये विभाजित होणार असल्याने या जमिनीचे महत्व व मुल्य कमी होणार असल्याने सदर नुकसानीपोटी संबंधित शेतकरी पर्याप्त मोबदल्यास पात्र असल्यामुळे त्यांना न्याय देण्याची व इतरही लाभ उपलब्ध करण्याची जबाबदारी स्वीकारून वेकोलिने कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त करून या प्रकरणात आपण विशेष लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन उपस्थित शेतकऱ्यांना दिले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये