घुग्घुस-वणी मार्गावरील अवजड वाहनांच्या धोकादायक वाहतुकीबाबत पोलिसांना निवेदन

चांदा ब्लास्ट
घुग्घुस, चंद्रपूर – घुग्घुस-वणी मार्गाची अतिशय खराब व धोकादायक अवस्था लक्षात घेता आज (दि. ०२ ऑगस्ट २०२५) घुग्घुस येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक प्रतिनिधींच्या वतीने घुग्घुस पोलीस ठाण्यास निवेदन देण्यात आले. हे निवेदन शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख महेश डोंगे यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले, ज्यामध्ये घुग्घुस बस स्टॉप चौक, राजीवरत्न चौक आणि वर्धा नदीवरील पुलावरून सातत्याने होत असलेल्या अवजड वाहनांच्या धोकादायक वाहतुकीवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी करण्यात आली.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मागील आठवड्यात या मार्गावर दोन गंभीर अपघात झाले असून त्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर इतर दोन नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. दररोज या मार्गावरून ५० ते ६० टन वजन असलेले डंपर व ट्रक भरधाव वेगाने धावतात, यामुळे रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस खराब होत आहे आणि नागरिकांच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला आहे.
याशिवाय निवेदनात अवजड वाहनचालकांकडून करण्यात येणाऱ्या पुढील अनियमित बाबीही अधोरेखित करण्यात आल्या आहेत:
हौसिंग टायर उचलून वाहन चालवणे
कंडक्टर नसणे आणि चालकांकडून ड्रेस कोडचे उल्लंघन
कोळसा वाहतुकीसाठी त्रिपालचा वापर न केल्यामुळे रस्त्यावर विखुरलेला कोळसा आणि निर्माण होणारे वायुप्रदूषण
परिणामी नागरिकांना श्वासासंबंधी गंभीर त्रास
महेश डोंगे यांनी सांगितले की, “जनतेच्या सुरक्षेसाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी या मार्गावरून होणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तात्काळ बंदी घालणे अत्यावश्यक आहे.”
या निवेदनाची प्रत पालकमंत्री अशोक उईके, आमदार किशोर जोर्गेवार, जिल्हाधिकारी चंद्रपूर आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील पाठविण्यात आली आहे.
नागरिकांना आता स्थानिक प्रशासनाकडून ठोस व त्वरित कारवाईची अपेक्षा आहे.