ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 अंतर्गत लाभार्थ्यांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू

चांदा ब्लास्ट

शहर महानगरपालिकेमार्फत “प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0” योजना राबविली जात असुन या अंतर्गत दोन प्रकारांत अर्ज मागविण्यात येत आहेत. यातील वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम हा पहिला व तर भागीदारी तत्वावर परवडणारी घरे हा दुसरा घटक आहे.

   यातील वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम घटकांतर्गत चंद्रपूर शहरातील ज्या नागरिकांकडे स्थायी पट्टे (स्वतः मालकीची जागा) आहे (बांधकाम प्रतिबंधित क्षेत्र वगळता) त्यांना घरकुलाचा लाभ घेण्यास (रु. 2.50 लक्ष अनुदान) अर्ज करता येतो. तसेच भागीदारी तत्वावर परवडणारी घरे या घटकांतर्गत ज्या नागरीकांकडे स्वमालकीची जागा अथवा जमीन उपलब्ध नाही व चंद्रपूर शहरात भाडेकरू म्हणून वास्तव्यास आहेत अशा नागरिकांना अर्ज सादर करता येणार आहे.

    माननीय पंतप्रधान महोदयाच्या “सर्वांसाठी घरे” या संकल्पनेच्या अंतर्गत केंद्र पुरस्कृत “प्रधानमंत्री आवास योजना” आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व गरजू नागरिकांसाठी सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा दुसरा टप्पा 1 सप्टेंबर 2024 पासुन राबविण्यात येत आहे.ही योजना महिला सदस्याच्या नावावर किंवा संयुक्त नावावर घर/जमिनीची मालकी देऊन महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देते. या योजनेअंतर्गत, शहरी भागातील झोपडपट्टीवासीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), कमी उत्पन्न गट (LIG) आणि मध्यम उत्पन्न गट (MIG) श्रेणीतील इतर लोकांना प्राधान्य दिले जाते.

लाभार्थी पात्रता –

1. अर्जदार व त्याचे कुटुंबीय यांच्यापैकी कुणाचेही भारतात पक्के घर नसावे तसेच घरातील सदस्य शासनासोबत किंवा सरकारी गृहनिर्माण संस्थेसोबत घरधारक नसावेत.

2. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 4 लक्ष 50 हजार रुपयांच्या आत असावे.

3. लाभार्थी म्हणून गेल्या 20 वर्षात शासनाच्या कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

आवश्यक कागदपत्रे –

1. आधार कार्ड

2. ओळख पत्र (PAN/मतदार ओळखपत्र)

3. उत्पन्न प्रमाणपत्र (अस्सल प्रत)

4. बँक पासबुक (IFSC कोड असलेले)

5. मालमत्ता मालकीचे प्रमाणपत्र (7/12 उतारा, मालमत्ता दाखला)

6. घर बांधकाम परवानगी/मंजूरी पत्र

7. विवाह प्रमाणपत्र (विवाहित असल्यास)

8. जातीचा दाखला (SC/ST/OBC साठी)

9. विकलांग प्रमाणपत्र (अर्जदार अपंग असल्यास)

10. पासपोर्ट साईझ फोटो (२ नग)

11. आधार लिंक असलेले मोबाईल नंबर

12. शपथपत्र तसेच घटक क्र. 2 मध्ये अर्ज करतांना शहरात कुठेही स्थावर मालमत्ता नसल्याचे प्रमाणपत्र आवश्यक राहील

येथे करावा अर्ज –

उमेदवारांनी https://pmay-urban.gov.in या संकेतस्थळावर किंवा जवळच्या सेतू केंद्रावर ऑनलाईन अर्ज सादर करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे बंधनकारक आहे.

अधिक माहितीकरिता संपर्क:

घरकुल विभाग,सात मजली इमारत,प्रथम माळा,चंद्रपूर

शहर महानगरपालिका.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये