महापालिकेने त्या पुतळ्याचे बांधकाम तातडीने थांबवावे
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांच्या उपस्थितीत महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

चांदा ब्लास्ट
परिसराला “अम्मा चौक” नाव देण्याचा घाट
चंद्रपूर : शहर पोलीस स्टेशन आणि सात मजली इमारत यांच्या मधोमध असलेल्या जागेवर चंद्रपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून अचानक एका पुतळ्याचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. ही जागा सध्या पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली असतानाही कोणतीही पूर्वसूचना अथवा परवानगी न घेता सुरू करण्यात आलेल्या या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या अनधिकृत कामाचा तीव्र निषेध करत चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी हे बांधकाम तातडीने थांबविण्याची मागणी केली. त्यांनी या संदर्भात महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल यांना निवेदन सादर करून सदर बांधकामास त्वरित स्थगिती देण्याची मागणी केली आहे.
चंद्रपूर शहरातील सात मजली समोरील फुटपाथ वर स्व. गंगुबाई जोरगेवार (अम्मा) टोपल्या विकायला बसायच्या. त्या सदर जागेला परिसराला “अम्मा चौक” असे नांव देण्याबाबत मनपा प्रशासकाने मान्यता प्रदान केली. चंद्रपूर शहरातील स्वातंत्र्य संग्राम सैनिक, समाजसेवक, माजी लोकप्रतिनिधी यांच्या कार्याची आठवण ठेवून मनपाने कधीच स्मारक बनण्याचा विचार केला नाही. मात्र एखादी महिला त्या ठिकाणी टोपल्या विकत होती म्हणून त्या परिसराला त्यांचे नाव देणे कितपत योग्य आहे. हा संपूर्ण परिसर गांधी चौक म्हणून ओळखला जातो मात्र ही ओळख पुसण्याचा डाव आखण्यात देत आहे, असा आरोप तिवारी यांनी केला.
तिवारी यांनी सांगितले की, हा परिसर पुरातत्व विभागाच्या संरक्षणाखाली येतो. त्या जागेवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करणे कायद्याच्या विरोधात आहे. अशा प्रकारची कारवाई केल्यास शहरातील ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला धोका पोहोचू शकतो.
महानगरपालिकेने या प्रकरणी तातडीने खुलासा करावा आणि संबंधित काम थांबविण्याची कारवाई करावी, अशी मागणी देखील या निवेदनात करण्यात आली आहे.