आ. जोरगेवार यांच्या पुढाकारातून ३५ रुग्ण शस्त्रक्रियेसाठी आचार्य विनोबा भावे रुग्णालयात रवाना
देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह निमित्त आयोजित महाआरोग्य शिबिरात करण्यात आली होती तपसणी

चांदा ब्लास्ट
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहाच्या अंतर्गत आयोजित महाआरोग्य शिबिरात अनेक रुग्णांमध्ये गंभीर स्वरूपाचे आजार आढळून आले. या रुग्णांवर निशुल्क शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात ३५ रुग्णांना सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात रवाना करण्यात आले.
या रुग्णांना आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने बसच्या माध्यमातून पाठविण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, नामदेव डाहुले, अॅड. राहुल घोटेकर, प्रसाद जोरगेवार आदींची उपस्थिती होती.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर विधानसभा मतदार संघाच्या वतीने देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून शकुंतला लॉन येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात मुंबईसह संपूर्ण विदर्भातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सेवा दिली. यात पाच हजारांहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान अनेक रुग्णांमध्ये हृदयरोग, कॅन्सर, अस्थिरोग, नेत्ररोग यांसारखे गंभीर आजार आढळून आले. यावर सर्व उपचार निशुल्क करण्यात येत असून, काही रुग्णांवर शस्त्रक्रिया करणे आवश्यक ठरले आहे. आजच्या पहिल्या टप्प्यात ३५ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी सावंगी मेघे रुग्णालयात रवाना करण्यात आले असून, येत्या दिवसांत उर्वरित रुग्णांनाही टप्प्याटप्प्याने शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात येणार आहे.