शहरी शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी अर्ज आमंत्रित

चांदा ब्लास्ट
शहरातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत, अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक कुडा-मातीच्या घरात, झोपडयांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवाऱ्यांत राहतात, अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येत आहे.
आदिवासी उपयोजनेअंतर्गत अनुसूचित जमातीतील (आदिवासी), गावठाण क्षेत्रातील नागरिकांना त्यांचे मागील 3 वर्षांच्या घरटॅक्स पावतीच्या आधारे तसेच गावठाण क्षेत्राबाहेरील नागरिकांना त्यांचे स्वःमालकीचे जागेवर घरकुलाचा लाभ देण्यात येत असुन पात्र व गरजू आदिवासी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने अर्ज सादर करून शबरी शहरी घरकुल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
लाभार्थी पात्रता –
1) लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा.
2) स्वतःच्या नावाने पक्के घर नसावे.
3) महाराष्ट्र राज्यातील 15 वर्षापासून रहिवासी असावा.
4) घराचे बांधकाम करण्यासाठी स्वतःची किंवा शासनाने दिलेली जमीन असावी.
5) यापूर्वी कोणत्याही शासकीय घरकूल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
6) वय वर्षे 18 पूर्ण असावे.
7) स्वतःच्या नावाने बैंक खाते असावे.
8) घरकुलाच्या बांधकामासाठी किमान 269.00 चौरस फुट जागा उपलब्ध असावी.
9) वार्षिक उत्पन्न मर्यादा रूपये 3 लक्ष पर्यंत असावी.
आवश्यक कागदपत्रे –
1) अर्जदाराचे नजीकच्या काळातील 2 पासपोर्ट साईज फोटो
2) रहिवासी प्रमाणपत्र (15 वर्षापासून रहिवासी असणे आवश्यक)
3) अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र (कास्ट सर्टिफिकेट)
4) घरकूल बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे किंवा नाही यासाठी पुरावा.
5) उत्पन्नाचा दाखला (तहसिलदार यांचा)
6) शिधापत्रिका (रेशन कार्ड)
7) आधार कार्ड
8) एक रद्द केलेला धनादेश (कँसल्ड चेक) अथवा बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत (फोटो व खाते क्रमांक, IFSC कोड स्पष्ट दिसत असलेले)
9) गावठाण क्षेत्रातील ज्या लाभार्थ्यांकडे जमिनीची मालकी नाही अशा लाभार्थ्यांनी मागील 3 वर्षाच्या मालमत्ता कर पावती सादर करावी. सोबत कर मुल्यांकन प्रत सादर करावी.
अर्ज करावयाची पद्धत – विहित अर्ज घरकुल विभाग,सात मजली इमारत,प्रथम माळा,चंद्रपूर महानगरपालिका येथे उपलब्ध आहे. अर्ज आवश्यक सर्व कागदपत्रांसह वरील कार्यालयात सादर करावा.
अनुदान रक्कम – घरकुल बांधकामासाठी अनुदान रक्कम ही रूपये 2.50 लाख एवढी राहील. सदर अनुदान रक्कम ही खालील प्रमाणे 4 टप्प्यांत लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बॅक खात्यात जमा करण्यात येईल.
1) घरकुल मंजूरी 40 हजार रुपये
2) प्लिंथ लेव्हल 80 हजार रुपये
3) लिंटल लेव्हल 80 हजार रुपये 4) घरकुल पूर्ण 50 हजार रुपये