लालपरी झाली माहितीची दूत; सरकारी योजना आता तुमच्या दारी! _ अनुराग गोवर्धन

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) चंद्रपूर आगारातील बस स्थानकाने आता केवळ प्रवाशांची वाहतूक न करता, माहिती देण्याचेही महत्त्वाचे कार्य सुरू केले आहे. नुकत्याच नुतनीकरण करण्यात आलेल्या मुख्य बस स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी विविध सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पावसाच्या पाण्याच्या गळतीमुळे प्रकाश झोतात आलेल्या चंद्रपुरातील मुख्य बस स्थानकात अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे २०२४ मध्ये या स्थानकाचे नूतुनीकरण करण्यात आले. आणि आता ते अधिक आधुनिक रूपात प्रवाशांच्या सेवेत दाखल झाले आहे.
या आगारातील एक लक्षणीय बाब म्हणजे इथल्या बसगाड्यांवर लावण्यात आलेले शासकीय योजनांचे फलक. हे बॅनर केवळ सजावटीपुरते नसून नागरिकांना थेट आणि सहजपणे माहिती मिळवून देणारे माध्यम ठरत आहेत. गरजू नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती पोहोचवण्याचा हा अभिनव उपक्रम ठरतो आहे.
आजही ग्रामीण भागातील अनेक नागरिक शासकीय कार्यालयांमध्ये माहिती मिळवण्यासाठी अनेक वेळा हेलपाटे घालतात. तेथील अधिकाऱ्यांचे उद्धट वर्तन, अस्पष्ट मार्गदर्शन आणि यंत्रणांची टाळाटाळ यामुळे अनेकांना योजनांचा लाभ मिळत नाही. परिणामी, शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याऐवजी नागरिक भ्रमित होतात, आणि योग्य माहितीअभावी संधी गमावतात. हीच अडचण ओळखून एस. टी. महामंडळाने आपले वाहन माध्यम म्हणून वापरून एका चांगल्या उपक्रमाची सुरुवात केली आहे.
बसगाडीवर लावण्यात आलेल्या फलकांवर प्रधानमंत्री आवास योजना, शासकीय कर्जमाफी योजना, कन्यादान योजना, आंतरजातीय विवाह योजना, आयुष्मान भारत योजना, उज्ज्वला गॅस योजना, शिष्यवृत्ती योजना, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अशा विविध योजनांची थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे गावो-गावात फिरणाऱ्या या बसेसद्वारे नागरिकांना थेट योजनांची माहिती मिळत आहे. या उपक्रमातून एस. टी. महामंडळाने वाहतूक सेवा पुरवण्यापलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.
ग्रामीण भागातील जनतेपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचवण्यासाठी हा विशेष उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत ४० ते ५० एस. टी. बसेसवर योजनांची जाहिरात लावण्यात आली आहे. हा उपक्रम शासनामार्फत राबविण्यात येत असून, MSRTC हे केवळ माध्यम आहे. नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
हेमंत गोवर्धन,आगार प्रमुख, चंद्रपूर