वसाहती शेजारीच कब्रस्तानाचे बांधकाम रहिवाशांचा विरोध : पत्र परिषदेत माहिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती येथील संताजी नगर लगत असलेल्या गुलमोहर कॉलनीला लागूनच कब्रस्तानाचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम संबंधित शासकीय विभागाने त्वरित थांबवून काढून टाकावे अन्यथा आंदोलन करू असा इशारा स्थानिक रहिवाशांनी पत्र परिषदेत दिला. स.नं.१८८ ही खासगी जागा २०१४ मध्ये अकृषक करण्यात आली.
त्या ठिकाणी अनेकांनी प्लॉट विकत घेऊन घरांचे बांधकाम केले आणि रहावयास सुद्धा आले आहेत. गुलमोहर कॉलनी या नावाने परिचित असलेल्या या कॉलनी लगतच सर्वे नंबर १८७ आहे. ही जागा शासकीय असून काही दिवसांपूर्वी एका समाजाच्या समूहाने या कॉलनी लगतच कब्रस्तानाचे बांधकाम सुरू केले. बांधकाम ठेकेदार कलीम शेख यांनी सुरुवातीस या ठिकाणी स्थानिक रहिवाशांसाठी बगीचा होत असल्याचे सांगितले.
मात्र संरक्षण भिंत पूर्ण झाल्यानंतर याच ठेकेदाराने या ठिकाणी कब्रस्तान होत असल्याची माहिती दिली. त्यामुळे हादरलेल्या येथील रहिवाशांनी याबाबत नगरपरिषद आणि तहसील कार्यालयात हे काम थांबवण्या करिता आणि केलेले बांधकाम काढून टाकण्याकरिता निवेदन दिले. वसाहतीला लागूनच कब्रस्तान झाल्यास या ठिकाणी राहणारी लहान मुले महिला यांच्या मानसिकतेवर परिणाम होईल अशी भीती तेथील नागरिकांनी व्यक्त केली.
पत्र परिषदेला रहिवाशी सुरेश चापले, शंकर नागपुरे, भाग्यश्री वाकडे,रमेश नागपुरे, ज्योती शेरकी, संजय नंदनवार, कुणाल चापले, योगेश वाघमारे, प्रीती आत्राम,सुनीता नागपुरे,आशिष मून, राकेश आत्राम, मनोज वऱ्हाटे, चेतन भाकरे आदी रहिवासी उपस्थित होते.