शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश घरा-घरात!
जिवती ठाणेदारांचा अनोखा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- समाजात व्यसनमुक्तीचा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी जिवती पोलिस ठाण्याने एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीची संकल्पना घरा-घरात पोहोचवण्याचा ध्यास ठाणेदारांनी घेतला आहे. या उपक्रमात शाळकरी मुलांना व्यसनाच्या दुष्परिणामांबाबत जागरूक करून त्यांच्यामार्फत समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
विद्यार्थी हे समाजाचे भविष्य आहेत.त्यांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश घरा-घरात पोहोचवला तर तो अधिक प्रभावी ठरेल. मुलांचे शब्द पालक आणि समाज गंभीरपणे घेतो त्यामुळे परिसरातील शाळेत असे कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना जागृत करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन जिवती पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रविण जाधव यांनी जिवती येथील शासकीय आश्रमशाळेत जिवती येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना सांगितले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसह पोलिस कर्मचारी उपस्थित होते. जिवती परिसरातील शाळांमध्ये विशेष कार्यशाळा आणि जागरूकता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत.
यामध्ये विद्यार्थ्यांना दारू, तंबाखू, गुटखा आणि इतर व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत माहिती देण्यात येत आहे. यासोबतच, त्यांना व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व आणि निरोगी समाजाची गरज याबाबत प्रेरणादायी व्याख्याने दिली जात आहेत. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना घरी जाऊन आपल्या पालकांना आणि शेजाऱ्यांना व्यसन सोडण्याचे आवाहन करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे.
हा उपक्रम केवळ जिवतीपुरता मर्यादित नसून, येत्या काळात जिल्ह्यातील इतर भागांतही त्याचा विस्तार करण्याचा मानस पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांच्या नजरेतून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.