देवलागुडा येथील शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर बचत गटातील तरूणांकडून कुटुंबाला आर्थिक मदत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- देवलागुडा येथील शेतकरी भगवान गोपीनाथ राठोड यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून २४ जुलै २०२५ रोजी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मागे मोठे कुटुंब असून, त्यांची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. या दुखद घटनेनंतर गावातील वसंतराव नाईक पुरुष बचत गटाने पुढाकार घेत मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली.
वसंतराव नाईक पुरुष बचत गटात १२ सदस्य असून, प्रत्येक सदस्य दरमहा ५०० रुपये जमा करतो. या गटाचे अध्यक्ष कैलास जाधव, सचिव विकास चव्हाण यांच्यासह प्रेम राठोड, किसन जाधव, दत्ता चव्हाण, कृष्णा जाधव, कैलास पवार, प्रेमदास राठोड, संदीप राठोड, केशव राठोड, अविनाश जाधव आणि मृतक कुटुंबातील सदस्य धोंडिबा राठोड यांचा समावेश आहे. गटाच्या माध्यमातून गावातील गरजूंना नेहमीच मदत केली जाते. यावेळी गटाने मृतकाच्या कुटुंबाला ५,००० रुपयांची छोटीशी आर्थिक मदत प्रदान केली.