घुग्घुस-चंद्रपूर मार्गावरील सुरक्षा उपक्रम: सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने हटविण्यात आली साचलेली माती

चांदा ब्लास्ट
दिनांक २३ जुलै २०२५ रोजी घुग्घुस-चंद्रपूर मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. माजी ग्रामपंचायत उपसरपंच सुधाकर बंदूरकर, सामाजिक कार्यकर्ते प्रणयकुमार बंडी व भारत साडवे यांच्या सक्रिय पाठपुराव्यामुळे घुग्घुस पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय योगेश पाटील यांनी IVRCL कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.
या उपक्रमाला तत्काळ प्रतिसाद देत VRCL चे दीपक चौबे, विशाल डोंगरकर व सचिन टिप्ले यांनी सदर परिसराची पाहणी केली. पाहणीदरम्यान बसेरा ढाब्यापासून बायपास मार्गापर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती साचलेली आढळून आली, जी अपघातास कारणीभूत ठरत होती.
या पार्श्वभूमीवर सिद्धार्थ चौरे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक २३ जुलै २०२५ रोजी सदर रस्त्यावरून माती हटविण्याचे काम पार पाडण्यात आले. या मोहिमेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला, कारण हा मार्ग अनेक दिवसांपासून धुळीमुळे आणि साचलेल्या घाणीतून अपघातप्रवण बनला होता.
स्थानिक नागरिक व प्रवाशांनी घुग्घुस पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांचे आभार मानले. नागरिकांनी सांगितले की, या मार्गावरून जड वाहतूक सुरू असते व त्यामुळे साचलेली माती ही अपघातांची शक्यता वाढवित होती, जी आता बर्याच अंशी कमी झाली आहे.
हा उपक्रम प्रशासन व नागरिकांच्या संयुक्त सहकार्याचे उत्तम उदाहरण ठरला असून, या माध्यमातून परिसरात सुरक्षित वाहतुकीला चालना मिळाली आहे.