अंगणवाडीत पाणीटंचाई आणि अस्वच्छतेमुळे बालकांच्या आरोग्याला धोका
महिला काँग्रेसचा नगर परिषदेला निवेदन

चांदा ब्लास्ट
शहरातील सुभाष नगर येथील अंगणवाडी क्र. 27 मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बोरिंग बंद असल्याने अंगणवाडीत येणाऱ्या लहान मुलांना पाण्याच्या अभावामुळे त्रास सहन करावा लागत आहे. तसेच परिसरात झाडं-झुडपं वाढलेली असून कचरा साचल्यामुळे सर्प व विंचूंचा धोका निर्माण झाला आहे.
तसेच जवळील चिल्ड्रेन पार्क (बाल उद्यान) मध्येही झाडं-झुडपं, कचरा आणि अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त आहेत. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत महिला काँग्रेसच्या जिल्हा महासचिव पद्मा त्रिवेणी यांनी घुग्घुस नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांना निवेदन देत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
या वेळी झोया शेख, लक्ष्मी गोदारी, दुर्गम्मा आरापेल्ली, सुगना डोमा यांच्यासह इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
लक्षवेधी मुद्दा :
महिला पदाधिकाऱ्यांना अंगणवाडीत झालेल्या समस्यांसाठी थेट नगर परिषद कार्यालयात जाऊन निवेदन द्यावे लागत असेल, तर संबंधित अंगणवाडीच्या टीम लीडर आणि सेविकांची कार्यपद्धती कितपत सक्रिय आहे, याबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. या संदर्भात पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.