बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र ठरेल भविष्यातील हरित अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास

चांदा ब्लास्ट
खाणबाधित क्षेत्रातील बांबू कारागीर महिलांना उपजिविका टूलकिट व बांबू रोपे वितरण
चंद्रपूर बांबू हे केवळ झाड नाही तर ग्रामीण अर्थव्यवस्थेचे बळ आहे. बांबू हस्तकला कौशल्य, योग्य प्रशिक्षण आणि बाजारपेठेतील स्थितीबाबत मार्गदर्शन मिळाल्यास महिलांना आत्मनिर्भरतेचा मार्ग खुला होईल. आपल्या कारागीर भगिनींमध्ये असलेल्या प्रतिभेला योग्य दिशा देण्याचे मोलाचे कार्य चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र करीत आहे. हे केंद्र भविष्यात हरित अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ ठरेल, असा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
वनअकादमी येथे चिचपल्ली बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून खाणबाधित क्षेत्रातील महिला बांबू कारागीरांना आ. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते उपजीविका टूलकीट व बांबू रोपांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला आमदार देवराव भोंगळे, श्रीमती अर्चना भोंगळे, मुख्य वनसंरक्षक एम. रामानुजन, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक अशोक खडसे, विभागीय वन अधिकारी ज्योती पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, वनपरिक्षेत्र अधिकारी मल्लेलवार, उपकार्यकारी अभियंता संजोग मेंढे, बांबू असोसिएशनच्या अध्यक्षा स्नेहल खापणे, सरपंच (मोहर्ली) सुनिता गायकवाड, प्रकाश धारणे,सरपंच (मोठा निंबाळा) सौरभ दुपारे, सरपंच (चोरगाव) तृणाली धंदरे,नम्रता ठेमस्कर, प्रज्वलंत कडू आदींची उपस्थिती होती.
आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘वनमंत्री असताना नेहमी वाटायचं वनविभागाने असं काम करावं की, हिरव्या बांबूपासून प्रयत्नांची पराकाष्ठा करत हिरव्या संपत्तीपर्यंतचा प्रवास घडावा. महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी सरकारने ‘लाडकी बहीण योजना’ सुरू केली. बांबूपासून थेट बाजारपेठ गाठायची असेल, तर त्यासाठी योग्य प्रशिक्षणाची गरज आहे. याच उद्देशाने कर्तव्यभावनेतून चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले. आज जगभरात बांबूला मोठी मागणी आहे, पण ‘बांबूपासून बाजारापर्यंत’ ही एक मोठी शृंखला आहे आणि ती पार करण्यासाठी सक्षम पायाभूत सुविधा, कौशल्य व धोरणात्मक पाठबळ आवश्यक आहे. चंद्रपूर जिल्ह्याने विविध क्षेत्रांमध्ये देशाच्या नकाशावर ठसा उमटवला आहे. आता बांबू क्षेत्रातही चंद्रपूरचे नाव देशाच्या नकाशात गौरवाने घेतले जाईल,’ असा विश्वास आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
बांबूपासून कपडे, घरे तसेच अनेक उपयुक्त वस्तू तयार करता येतात. त्यामुळे या क्षेत्रात अधिक संशोधन होणे अत्यावश्यक आहे. चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे स्वरूप आधुनिक व परिणामकारक करण्याची आवश्यकता असून, त्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
बांबू हँडीक्राफ्ट अँड आर्ट युनिट (भाऊ) चा सखोल आढावा घेऊन त्याचे कार्य अधिक परिणामकारक करण्याची आवश्यकता आहे. येथे उत्पादित होणाऱ्या उत्कृष्ट दर्जाच्या वस्तूंना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. येथील कारागिरांकडे उत्कृष्ट कौशल्य असूनही त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळत नाही, ही मोठी अडचण आहे. त्यामुळे बांबूवर आधारित उत्पादनांचे प्रशिक्षण, त्यांची निर्मिती आणि त्यानंतर प्रभावी विपणन व विक्रीव्यवस्था उभारणे ही काळाची गरज आहे. बांबूच्या सुमारे 1250 प्रजाती अस्तित्वात आहेत. त्यातील काही जाती महाराष्ट्र व चंद्रपूरमध्ये विकसित करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. हे सर्व काम मिशन मोडमध्ये राबवले पाहिजे, तरच बांबू क्षेत्रात आर्थिक व औद्योगिक परिवर्तन शक्य आहे. असेही आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
ते पुढे म्हणाले, चंद्रपूर सुपर थर्मल पावर स्टेशन (सीएसटीपीएस) येथे कोळशासोबत पर्यायी इंधन म्हणून बांबू पॅलेट्सचा वापर करता येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. सीएसटीपीएसमध्ये दररोज जवळपास 30 हजार टन कोळशाची गरज असते, त्या तुलनेत 1500 टन बांबू पॅलेट्सचा पुरवठा करण्याच्या दिशेने विचार करण्याची गरज आहे. अयोध्येतील प्रभु श्री राम मंदिराच्या उभारणीसाठी, तसेच नवीन संसद भवन आणि पंतप्रधान कार्यालयातील फर्निचरसाठी बल्लारपूर मतदारसंघातून टिकवूडचा पुरवठा करण्यात आल्याचेही यावेळी त्यांनी नमूद केले.
चंद्रपूर जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी ताडाळी येथे एफआयडीसीसाठी 10 एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. या ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा यंत्रसामग्रीची उभारणी केली जाणार आहे. बांबू क्षेत्रात पुढे जाण्याच्या दृष्टीने चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली. बांबूपासून तयार करण्यात आलेला 7 फूट उंचीचा तिरंगा ध्वज पंतप्रधान कार्यालयात देण्यात आल्याने चंद्रपूरच्या कारागिरांचे कौशल्य राष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. मनापासून ते वनापर्यंत आणि वनापासून ते धनापर्यंत’ असा चंद्रपूरचा प्रवास अधिक सक्षम, गतिमान आणि समृद्ध होण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
महिला सक्षमीकरणासाठी प्रोत्साहन भत्ता धनादेशाचे तसेच उपजीविका टूलकीटचे वितरण:
नांदगाव (पोडे) महिला गट रु. 29,100, वरवट महिला गट रु. 86,500, चोरगाव महिला गट रु. 53,400, मोहर्ली महिला गट रु. 42,750, निंबाळा महिला गट रु.31,500, घुगुस महिला गट रु. 88,800, बांबू सखी महिला गट रु. 12,450 अशा विविध महिला गटांना प्रोत्साहन भत्त्याचे धनादेश तसेच प्रेरक मानधनाच्या रु. 50,000 च्या धनादेशांचे वितरण याशिवाय खाणबाधित क्षेत्रातील महिला बांबू कारागिरांना टूल उपजीविका कीट व बांबू रोपाचे वितरण आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.