ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आगामी चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेवकांची बैठक संपन्न

चांदा ब्लास्ट

आगामी चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज माजी नगरसेवकांची महत्वाची बैठक पार पडली. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर आणि आमदार किशोर जोरगेवार यांनी माजी नगरसेवकांना मार्गदर्शन करताना जनसंपर्क वाढविण्याच्या तसेच नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याच्या सूचना केल्या.

या बैठकीला महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, उपमहापौर अनिल फुलझेले, भाजप नेते अशोक जिवतोडे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, प्रकाश देवतळे, अजय जयस्वाल, दशरथ सिंह ठाकूर, मंडळ अध्यक्ष प्रदीप किरमे, रवी जोगी, अॅड. सारिका संदुरकर, स्वप्नील डुकरे, भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य तुषार सोम, वनिता कानडे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे सर्व माजी नगरसेवक उपस्थित होते.

या बैठकीत पक्ष संघटना अधिक बळकट करण्यावर विशेष भर देण्यात आला. प्रभागातील स्थानिक समस्या, कार्यकर्त्यांच्या अडचणी आणि नागरिकांच्या अपेक्षा यावर सविस्तर चर्चा झाली. पक्ष कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत समस्या समजून घेण्याचा आणि त्यावर ठोस उपाययोजना करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

यावेळी बोलताना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर म्हणाले की, आपण केलेले काम आता प्रभावीपणे प्रभागातील नागरिकांपर्यंत पोहोचवा. पक्षाचे विचार प्रत्येक घरी पोहोचविणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. व्यक्तिकेंद्रित काम न करता पक्ष म्हणून संघटितपणे काम करा. पक्ष, जनसंपर्क आणि परिश्रम हा निवडणूक जिंकण्याचा मंत्र आहे, असे आवाहन त्यांनी सर्व माजी नगरसेवकांना केले.

यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले की, आजची ही बैठक केवळ निवडणूक तयारीची नाही, तर आपल्या एकत्रित ताकदीचा आणि पक्ष संघटनेच्या दृढतेचा संकल्प करण्यासाठी आहे. आपल्या प्रत्येक प्रभागातील समस्या, कार्यकर्त्यांच्या अडचणी, नागरिकांच्या अपेक्षा या सगळ्या आपण प्रत्यक्ष जाणून घेतल्या पाहिजेत. लोकांशी थेट संपर्क ठेवून त्यांच्या अडचणी सोडवणे हीच आपल्या कामाची खरी ओळख आहे. आपण एकसंघ राहून काम केले पाहिजे असे ते म्हणाले. या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल तुषार सोम यांचा सत्कार करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये