वणी क्षेत्र व CWS तडाळीमध्ये CMPFOतर्फे पेन्शन अदालत व त्रिपक्षीय बैठक आयोजित
पेन्शनधारकांच्या समस्या सोडवण्यासाठी ‘प्रयास’ शिबिर यशस्वीपणे पार पडले

चांदा ब्लास्ट
तडाळी, चंद्रपूर : दिनांक 11 जुलै 2025 रोजी वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (WCL) वणी क्षेत्र व CWS तडाळी येथे क्षेत्रातील पेन्शनधारकांचे प्रलंबित भविष्य निर्वाह निधी (PF) व पेन्शन दावे तातडीने निकाली काढण्यासाठी कोल मायन्स प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (CMPFO), नागपूर यांच्या वतीने २२व्या त्रिपक्षीय समन्वय समितीच्या बैठकीसह “प्रयास” (PRAYAS – Prompt Resolution for Assured Access to Social Security) अंतर्गत पेन्शन समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात मोठ्या संख्येने पेन्शनधारकांनी सहभाग घेत आपापल्या समस्या व तक्रारी थेट अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महा व्यवस्थापक श्री. सब्यसाची डे यांनी भूषवले. याप्रसंगी CMPFO नागपूरचे क्षेत्रीय आयुक्त श्री. शशांक रायझादा यांनी पेन्शनधारकांच्या समस्या प्राधान्याने ऐकून घेत पेन्शन संबंधित व्यवहारात पारदर्शकता, वेळेत निपटारा आणि तक्रारींचे जलद निराकरण यावर विशेष भर दिला.
रायझादा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘C-Cares’ पोर्टलविषयी एक संक्षिप्त कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत पेन्शन संदर्भातील कागदपत्रांचे डिजिटायझेशन, त्याची प्रक्रिया, फायदे व उपयोग याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. त्यांनी सांगितले की, या पोर्टलच्या माध्यमातून पेन्शनधारकांना डिजिटल स्वरूपात जलद सेवा देण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
शिबिरात CMPFO संबंधित काम पाहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. तसेच, या वेळी मुख्यालयातून आलेले अधिकारी, वणी क्षेत्रातील सर्व युनिट्समधील HR विभागाचे प्रतिनिधी व विविध कामगार संघटनांचे सन्माननीय प्रतिनिधीही उपस्थित होते.
‘प्रयास’ या उपक्रमाअंतर्गत पार पडलेला हा शिबिर पेन्शनधारकांसाठी एक सकारात्मक व समस्या-निवारण केंद्रित पाऊल ठरले.