सावली वनपरिक्षेत्रातर्फे गुराख्यांना इलेक्ट्रिक स्टिक व मुखवट्याचे वाटप
सावली वनपरिक्षेत्राचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली वनपरिक्षेत्रात वाघ, बिबट, अस्वल, रानटी डुक्कर व जंगली हत्तींचा सतत धुमाकूळ असल्याने वारंवार मानव वन्यजीव संघर्षाची घटना घडत असतात.
मागील ३ दिवसापासून मौजा जाम बू. येथील गावालगतच्या जंगल क्षेत्रात वाघाचे अस्तित्व असल्याने वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्याबाबतचे दि. ४ जुलै २०२५ रोजी निवेदन वनपरिक्षेत्र अधिकारी सावली यांना गावकऱ्यांकडून दिले असता, सावली वनपरिक्षेत्रातील संपूर्ण गुराखी व शेतकरी यांचे जीवितास हानी होऊ नये म्हणून तत्कालीन विभागीय वन अधिकारी श्री प्रशांत खाडे यांचे संकल्पनेतून व विद्यमान विभागीय वन अधिकारी चंद्रपूर श्री बापू येडे आणि श्री विकास तरसे सहाय्यक वनसंरक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रपूर वन विभाग चंद्रपूर अंतर्गत सावली वनपरिक्षेत्रातील अतिसंवेदनशील व जंगलालगतच्या गावातील गुराखी व शेतकऱ्यांना त्यांचे स्वयं संरक्षणासाठी वन विभागाद्वारे सदरचे उपक्रमाचा शुभारंभ म्हणून सावली तालुक्यातील मौजा जाम बु. येथील पोलीस पाटील श्री उमाकांत चरडुके श्री संजय पाल, श्री बंडू पाटील थोरात, श्री जीवन पाटील थोरात, श्री नीलकंठ पाटील चुधरी, श्री कैलास पाटील हुलके व इतर गावकरी यांचे उपस्थितीत श्री विनोद धुर्वे वन परिक्षेत्र अधिकारी सांवली यांचे हस्ते गुराखी श्री गणेश कन्नमवार रा. कोंडेकल याना इलेक्ट्रिक स्टिक व मुखवट्याचे वाटप करण्यात आले.
यानंतर वनविभागाकडील सर्वेक्षणानुसार नोंदणीकृत संपूर्ण गुराख्यांना इलेक्ट्रिक स्टिक व मुखवटे याचे वाटप करण्यात येणार असून मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली यांनी केले.