ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वणी (बु.) येथील आरोग्य उपकेंद्राला गळती

स्लॅब गळतीमुळे रुग्णांची हेळसांड ; रुग्णसेवेवर परिणाम 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- नागरिकांच्या आरोग्यासाठी शासनाने प्राथमिक आरोग्य उपकेंद्र खेडेगावांमध्ये सुरू केले आहे. मात्र तालुक्यातील वणी बु.येथील आरोग्य उपकेंद्रच समस्यांनी घेरलेले आहे. तेथे रुग्णांवर उपचार करायचे की, प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर उपचार करायचे? हाच प्रश्न उपस्थित होत आहे. तालुक्यापासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या व प्रचंड आदिवासी बहुल भाग व अतिदुर्गम भाग असलेल्या वणी बु.येथील आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीला पावसाळ्यात गळती लागली आहे. आरोग्य उपकेंद्राचे स्लॅब मोठ्या प्रमाणावर गळत असल्याने या गळतीमुळे उपकेंद्रात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. येथील बेडवरील गाद्या, चादरी तसेच आरोग्य केंद्रातील इतर महत्त्वाचे साहित्य व औषधे पाण्यात भिजत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. आरोग्य उपकेंद्राच्या या गळतीमुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे. तर आरोग्य उपकेंद्राच्या गळतीमुळे येथे काम करणे आरोग्य कर्मचाऱ्यांना त्रासदायक झाले आहे.

या आरोग्य उपकेंद्राच्या डागडुजीसाठी पावसाळ्यापूर्वीच लाखो रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र हे करण्यात आलेले डागडुजीचे काम अगदी थातूरमातूर उरकण्यात आले आहे. परिणामी पावसाळ्यात आरोग्य उपकेंद्राच्या मुख्य इमारतीला गळती लागली आहे. सर्वत्र पाणी, भिंती पाण्याने ओल्याचिंब झाल्या असून पाण्याच्या धारा वाहू लागल्या आहेत. पाणीच पाणी झाल्याने येथील औषध साठा शासकीय दस्तऐवज भिजत आहे.

तसेच पंखे, लाइटचे बोर्ड पूर्णपणे भिजत आहेत यामुळे त्या वस्तू खराब होत आहेत. आरोग्य केंद्राचे स्लॅबला गळती लागल्यामुळे आरोग्य केंद्रात सर्वत्र पाणीच पाणी पाहण्यास मिळत आहे. जिथे गळती लागली आहे. त्या ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांना बादल्या मांडाव्या लागल्या आहेत. परंतु तालुका आरोग्य विभागाने याबाबत तातडीने आरोग्य उपकेंद्राची गळती रोखण्यासाठी अद्याप कोणत्याच उपाययोजना न केल्याने मोठं आश्चर्य व्यक्त होत आहे. या आरोग्य उपकेंद्राची गळती कायम असून या गळतीमुळे रुग्णांचे मात्र प्रचंड हाल होत असल्याचे भयानक असे वास्तव येथे दिसत आहे.

परिणामी या आरोग्य उपकेंद्रामध्ये गावकऱ्यांचे आरोग्य सुरक्षित असेल का? हा प्रश्न उपस्थित होत आहे तर याकडे सार्वजनिक आरोग्य विभाग व जिल्हा परिषद दुर्लक्ष का करीत आहे ? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. आता पावसाळा सुरू असल्याने जिल्हा परिषदेने तात्काळ या आरोग्य उपकेंद्राची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये