जि.प.प्राथ.शाळा लालगुडा येथे वृक्ष दिंडी तथा वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना: निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष लावणे आवश्यक आहे,याची जनजागृती व्हावी व विद्यार्थ्यांना सुध्दा सामाजिक जबाबदारीची जाणीव व्हावी या उद्देशाने कोरपना तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लालगुडा येथे वृक्ष दिंडी तथा वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
वृक्ष दिंडी गावातील प्रमुख मार्गाने निघाली. सर्व चौक,रस्ते,गावातील प्रमुख ठिकाणी जनजागृती करण्यात आली.दिंडीचे विसर्जन शाळेच्या परिसरात करण्यात आले.वृक्षावर माया,मिळेल थंडगार छाया,आता चालवा एकच चळवळ,लावा वृक्ष करा हिरवळ,झाडे लावा खूप खूप जमिनीची थांबेल धूप.झाडे लावा,जीवन वाचवा.
एक मूल एक झाड इ.घोषवाक्य देत दिंडी काढण्यात आली .वेगवेगळ्या वेशभूषा करून मुलांनी दिंडीमध्ये सहभाग घेतला .वृक्षदिंडीचा समारोप झाल्यानंतर शाळेच्या परिसरात, रस्त्याच्या दुतर्फा व गावातील प्रमुख ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष फकरू मरस्कोल्हे, उपाध्यक्ष अमावस्या तोडासे, ग्राम पंचायत सदस्य मंगेश धुर्वे,अंगणवाडी सेविका नीलिमा मरस्कोल्हे ,शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश बोबडे व उपक्रमशील शिक्षक गोविंद पेदेवाड यांनी सहकार्य केले.