भद्रावतीचा सुप्रसिद्ध शिंगाडा होणार हद्दपार
दुषीत तलावांमुळे शिगाडा पिकावर संकट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
अनेक बाबिंसाठी सुप्रसिध्द असलेले भद्रावती शहर हे शिंगाडा या पारंपारीक व रुचकर पिकासाठी प्रसिध्द आहे.भद्रावतीचे नाव घेतले की रुचकर शिंगाड्याची आठवण आल्याशिवाय राहात नाही. मात्र तलाव बोड्यांची दिवसेंदिवस कमी होत असलेली संख्या व आहे त्या तलावांचे दुषीतीकरण यामुळे हळुहळु शिंगाडा पिक हे भविष्यात हद्दपार होते की काय अशी भिती आहे.
शहरातील व शहराजवळील असलेल्या बहुसंख्य तलाव व बोड्यांमुळे शहरात शिंगाड्याचे पिक हे अनेक वर्षांपासून रुजले आहे.शिंगाडा ऊत्पादनाचे काम येथील ढिवर समाजातर्फे पारंपारीक पद्धतीने कित्येक वर्षांपासून केल्या जात आहे.
भद्रावतीचा शिंगाडा हा आपल्या ऊत्तम दर्जामुळे अगदी तेलंगणा व आंध्र प्रदेशापर्यंत पोहोचला आहे.मात्र दिवसेंदिवस येथील शिंघाड्याचे ऊत्पादन घटत असल्याचे दिसुन येत आहे.त्यामुळे या पिकावर ऊपजिवीका करणाऱ्या शिंगाडा ऊत्पादकिंवर याचा आर्थीक विपरीत परीणाम होतांना दिसुन येत आहे.शिंगाडा हे पिक पाण्यात घेण्यात येत असल्याने या पिकासाठी सहाजिकच तलाव व बोड्यांची आवश्यकता आहे. शहर तथा परीसरात जलसाठ्यांची मोठी संख्या असल्याने हे पिक येथे एकवटले आहे.
या पिकाचे बिज बाजारात ऊपलब्ध नसते त्यामुळे शिंगाड्याच्या वेली वर्षभर एखाद्या तलावात जतन करुन ठेऊन नंतर त्या बिजाई म्हणुन वापराव्या लागतात.साधारणता जुन महिण्याच्या सुरुवातीला या वेलींची लावण केल्या जाते.तर सप्टेंबर महिन्यापासून शिगाड्याचे ऊत्पादन निघण्यास सुरु होते.मात्र शहराचा व्याप दिवसेंदिवस वाढत चालल्याने शहरातील जलसाठे हळूहळू नष्ट होत आहे याचा फटका या पिकाला बसत आहे.
शहरातील अनेक तलाव सांडपाण्यामुळे प्रदुषीत झाले आहे.याचाही फटका या पिकाला बसत आहे. एकेकाळी शहरातील प्रत्येक तलाव व बोड्यांमधुन शिंगाड्याचे पिक घेतल्या जायचे मात्र आता या पिकाचे क्षेत्र चांगलेच घटले आहे.या पिकासाठी जमिनीची नाही तर तलाव बोड्यांची आवश्यकता आहे त्यामुळे हे पिक इतरत्र घेणे शक्य नाही.
आजच्या घडीला केवळ हातावर मोजता येईल एवढ्याच तलावांमधुन हे पिक घेतले जात आहे. भविष्यात तलावांअभावी येथील शिंगाडा पिक जवळपास नष्ट होईल असे येथील ऊत्पादकांना वाटते.असे झाल्यास या ऊत्पादकांचा एक मोठा रोजगार हिरावल्या जाऊन त्यांना आर्थिक फटका बसणार आहे.