कार्यकर्तेच भाजपचे शक्तिस्थान – आ. किशोर जोरगेवार
मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांची नियोजन बैठक

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वतीने अर्ज मागविण्यात आले आणि या अर्ज प्रक्रियेमध्ये 440 इच्छुकांनी आपली नोंदणी केली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने अर्ज दाखल होणे हे आपल्या पक्षाची ताकद, जनतेतील वाढता विश्वास आणि आपल्यातील प्रत्येकाच्या मनात असलेली सेवा भावनेची जाणीव दर्शवते. हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे. तिकीट वाटपातही कार्यकर्त्यांना प्राधान्य असेल. कार्यकर्तेच भाजपचे शक्तिस्थान असल्याचे प्रतिपादन निवडणूक प्रमुख आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
चंद्रपूर महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले होते. यात 440 इच्छुक उमेदवारांनी आवेदनपत्र सादर केले. आज (शुक्रवार) जैन भवन येथे सदर सर्व इच्छुकांच्या नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार बोलत होते.
या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, ओबीसी नेते अशोक जिवतोडे, ज्येष्ठ नेते विजय राऊत, नेते प्रकाश देवतळे, महिला आघाडी अध्यक्षा छबु वैरागडे, माजी महापौर राखी कंचार्लवार, अंजली घोटेकर, माजी उपमहापौर संदीप आवारी, बलराम डोडाणी, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंग ठाकूर, वंदना हातगावकर, तुषार सोम, महामंत्री रविंद्र गुरनुले, मनोज पाल, श्याम कनकम, सविता दंढारे, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर हेपट, मंडळ अध्यक्ष रवी जोगी, प्रदीप किरमे, सुभाष अदमाने, स्वप्निल डुकरे, माजी नगरसेवक संजय कंचार्लवार, अॅड. कुणाल घोटेकर, रवी आसवानी, बंटी चौधरी, अरुण तिखे, माजी नगरसेविका कल्पना बबूलकर, पुष्पा उराडे, वंदना तिखे, प्रवीण गिलबिले आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना निवडणूक प्रमुख आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, आजची नियोजन बैठक उमेदवारीसाठीची चर्चा नाही, तर आपली एकता, संघटन आणि पक्षनिष्ठा दृढ करण्याचा क्षण आहे. भाजपा ही केवळ एक राजकीय संस्था नाही तर विचारांची, संस्कारांची आणि लोकसेवेची शाळा आहे. येथे येणारा प्रत्येक कार्यकर्ता तळागाळातील लोकांच्या समस्या, त्यांच्या अपेक्षा आणि त्यांच्या विकासाची स्वप्ने मनात ठेवून काम करतो. निवडणूक ही फक्त पदाची लढाई नसते, ती नागरिकांच्या विश्वासाची आणि भविष्यातील विकासाची जबाबदारी आहे. चंद्रपूर महापालिकेची निवडणूक ही शहराच्या भविष्याची निवडणूक आहे. नागरिकांना पारदर्शक प्रशासन, विकासाभिमुख धोरण, आणि लोकांसाठी सतत उपलब्ध राहणारी व्यवस्था हवी आहे. ही अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आपली सर्वांची असल्याचे ते यावेळी म्हणाले.
उमेदवारी मिळणे हा निश्चितच सन्मान आहे, पण उमेदवारी न मिळाल्यानंतरदेखील पक्षासाठी मनापासून, निष्ठेने आणि त्याच जोमाने काम करणे हा त्याहून मोठा सन्मान आहे. उमेदवार एक असतो, पण त्यामागे उभे राहणारे शेकडो कार्यकर्तेच विजयाची खरी ताकद असतात. पक्ष ज्याचे नाव पुढे करेल, त्याच्यामागे सर्वांनी एकदिलाने, मतभेद दूर ठेवून, फक्त विजयाचे स्वप्न घेऊन उभे राहणे ही खरी संघटना आहे. भाजपा कधीही एखाद्याच्या व्यक्तीपूजनावर चालत नाही, भाजपा विचारांवर आणि कार्यकर्त्यांच्या बळावर चालणारा पक्ष असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आपली एकजूट टिकवा, निष्ठेने काम करा, मतभेद विसरा आणि पक्षाचा विजय हेच सर्वोच्च ध्येय समजून पुढे चलण्याचे आवाहन यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. यावेळी इच्छुक उमेदवारांसह भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



