ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नगर परिषदेच्या नाली सफाईची पोलखोल, व्यापारी त्रस्त

पावसात पुन्हा समोर आली जुनी समस्या

चांदा ब्लास्ट

घुग्घुस (चंद्रपूर) – नगर परिषदेकडून करण्यात आलेल्या नाली सफाईचे वास्तव पावसाळ्यात पुन्हा एकदा उघड झाले आहे. घुग्घुस-वणी मार्गावरील गोल्डन बिअर शॉपच्या परिसरातील वसाहती व शॉपिंग कॉम्प्लेक्सची परिस्थिती यंदाही अत्यंत दयनीय झाली आहे. स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, दरवर्षीप्रमाणे यंदाही नाली सफाई फक्त कागदोपत्री झाली असून प्रत्यक्षात काहीच काम झालेले नाही.

व्यापाऱ्यांनी सांगितले की, जून ते ऑगस्ट दरम्यानचे तीन महिने त्यांच्यासाठी संघर्षमय ठरतात. दुकानांसमोर पाणी साचते, नाल्या भरून वाहू लागतात आणि सांडपाणी थेट घरांमध्ये व दुकानांमध्ये पसरते. त्यामुळे ग्राहकही येण्याचे टाळतात आणि व्यवसायावर मोठा परिणाम होतो.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नगर परिषद नाली सफाईच्या नावाखाली केवळ औपचारिकता पूर्ण करत आहे. ही कामे वरवरच केली जातात आणि त्यांची कोणतीही प्रभावी तपासणी केली जात नाही. ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांची संगनमत असून दरवर्षी लाखो रुपये खर्च होऊनही परिस्थिती जस की तस राहते.

गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या कायम असून, अद्याप यावर कोणताही कायमस्वरूपी उपाय करण्यात आलेला नाही. नाल्यांची वेळेत खोल सफाई, प्रभावी जलनिस्सारण योजना आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होतच जाईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

स्थानिक व्यापारी संघ व नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, या समस्येवर कायमस्वरूपी उपाय योजावा, जबाबदार ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि नाली सफाईची प्रत्यक्ष व प्रभावी तपासणी केली जावी, जेणेकरून नागरिकांना दरवर्षी या त्रासाला सामोरे जावे लागू नये.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये