राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल, देऊळगाव राजा येथे ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी व पालकांनी सक्रिय सहभाग नोंदवत योगाची गुढमयता अनुभवली.कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या प्राचार्य डॉ. प्रियंका देशमुख यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व विशद करत सांगितले की, “निरोगी शरीरासाठी दररोज काही वेळ स्वतःसाठी द्यावा. योग, प्राणायाम आणि नियमित व्यायाम केल्याने शरीरासोबत मनही स्वस्थ राहते.”
त्यांच्यानंतर राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचे सचिव डॉ. रामप्रसाद शेळके यांनी भारतीय परंपरेतील योगाची गरिमा अधोरेखित केली. त्यांनी स्पष्ट केले की, २१ जून हा सूर्याच्या दक्षिणायनाची सुरुवात दर्शवणारा दिवस असून, या नैसर्गिक बदलामुळे रोगजंतू सक्रिय होतात. त्यामुळे योग साधना शरीराच्या प्रतिकारशक्तीला बळकट करण्यासाठी अत्यावश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात योग प्रशिक्षक पल्लवी संत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानाचे प्रात्यक्षिक सादर केले. विशेषतः मैथिली तायडे, काव्य संत मृण्मय सरकटे, आदिती भालेराव, जय गरड, ओम संत आणि सुमित या विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रेरणादायी योग सत्र घेत सर्व विद्यार्थ्यांना योगाभ्यासाचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमात बाळासाहेब गोजरे सर यांनी विद्यार्थ्यांना प्रकृती जपण्याचे, निसर्गाचा सन्मान करण्याचे आणि दररोज योग-व्यायाम करून जीवन अधिक सजग व सकारात्मक बनवण्याचे मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना, “योग म्हणजे केवळ शरीराचे नव्हे तर मनाचेही स्वास्थ्य आहे” असा संदेश दिला.कार्यक्रमास शाळेचे उपप्राचार्य फैजल उस्मानी, गोजरे सर, सर्व शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा उत्साह, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कार्यक्रमाची शिस्तबद्ध मांडणी यामुळे राजलक्ष्मी स्कूलमध्ये साजरा झालेला योग दिन एक प्रेरणादायी पर्वणी ठरला. एकत्रित आरोग्य, शांतता आणि समजूतदार जीवनाची वाट – योग!
राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘योग म्हणजे जीवनशैली’ हे खरेच अधोरेखित झाले!