कोरपना दिवाणी न्यायालयात योग साधनेचा उत्साहपूर्ण कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
कोरपना – तालुका विधी सेवा समिती, कोरपना यांच्या वतीने २१ जून २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दिवाणी न्यायालय, कोरपना येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश राहुल ए. रणनवरे तसेच सहदिवाणी न्यायाधीश डी. डी. सहारे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला न्यायालयातील अधिकारी, कर्मचारी व उपस्थित सर्वांनी एकत्र येत योगासनांची सुरेख सादरीकरणे अनुभवली.
यावेळी योग तज्ञ उत्तम मोहितकर यांनी उपस्थितांना विविध योगासने, प्राणायाम व ध्यानाचे प्रात्यक्षिक करून दिले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून योगाचे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक महत्त्व विशद केले. तसेच दररोजच्या दैनंदिन आयुष्यात योगाचा समावेश केल्याने तणावमुक्त जीवन जगता येते, आरोग्य सुदृढ राहते, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास दिवाणी न्यायालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, तसेच विधी सेवा समितीचे सदस्य उपस्थित होते. सर्वांनीच योग सत्रात सहभागी होऊन योग दिन साजरा करण्याचा आनंद घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी न्यायालय प्रशासन, विधी सेवा समितीचे सर्व सदस्य व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने कोरपना न्यायालयात झालेला हा कार्यक्रम सर्वांच्या आरोग्य जागृतीसाठी उपयुक्त ठरला, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.