ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वैभव संपन्न राष्ट्रासाठी संघाचे कार्य – अंबरीश पुंडलिक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

विज्ञान तंत्रज्ञानामुळे मानवाची भौतिक प्रगती झाली आहे परंतु त्याच बरोबर सर्वत्र झपाट्याने सांस्कृतिक ह्रास होतो आहे असे वातावरण आहे. भारत संस्कृतीमुळे टिकून आहे त्यामुळे संस्कृती पासून तोडण्याचे कुटुंब व्यवस्थेवर आघात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आपले कुटुंब, समाज, राष्ट्र या सर्वांसमोरील समस्यांची उकल होण्याकरिता एका संस्कारक्षम पिढीची गरज असून प्रत्येकाने राष्ट्रहितासाठी सकारात्मक योगदान देण्यासाठी कटिबद्ध असले पाहिजे. राष्ट्रासमोरील समस्यांची आव्हाने पेलून त्यावर मात करण्याची ताकद आपला विचार न बदलता शंभर वर्षे पूर्ण करीत असलेल्या व विश्वव्यापी बनलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आहे. संघ हे सांस्कृतिक संघटन आहे. व्यक्ति निर्माणातूनच राष्ट्र निर्माण होते त्यामुळे संघ शाखेच्या माध्यमातून अनुशासित, संस्कारित, चारित्र्यसंपन्न बणून संघटित होऊन आपले राष्ट्र वैभव संपन्न व्हावे यासाठीच संघाचे कार्य आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भारतीय विचार मंच बुलढाणा विभाग संयोजक अंबरीश पुंडलिक यांनी केले. येथील नगर संघ शाखेच्या विजयादशमी उत्साहात प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते.

 देऊळगावराजा येथील संघाचा किल्ला शाखेच्या मैदानावर दिनांक 15 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी संपन्न झालेल्या विजयादशमी उत्सवाच्या कार्यक्रमात मंचावर प्रमुख अतिथी म्हणून येथील महर्षी वशिष्ठ वेद विद्यालय व श्री संत तुकाराम महाराज वारकरी विद्यालयाचे प्रधानाध्यापक ह भ प श्री वेद विभूषण उदबोध महाराज पैठणकर हे होते तसेच मंचावर नगर संघ चालक पुरुषोत्तम धन्नावत हे विराजमान होते. प्रारंभी अतिथींच्या हस्ते शस्त्र पूजन झाले स्वयंसेवकांनी विविध प्रात्यक्षिके सादर केली. प्रास्ताविक परिचय आभार प्रदर्शन नगर संघ चालक पुरुषोत्तम धन्यवाद यांनी केले.

पुढे बोलताना पुंडलिक म्हणाले संघाचा शंभर वर्षाचा प्रवास सोपा नव्हता उपहास, विरोध, संघबंदी या सर्वांमधून जात आज संघाचा वटवृक्ष झाला आहे अ.भा.वी.प., मजदूर संघ, विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम, विद्याभारती, संस्कार भारती, किसान संघ, सेवा भारती अशा अनेक क्षेत्रांद्वारे राष्ट्र उभारणीच्या कार्यात संघाचे मोठे योगदान आहे. संघाच्या माध्यमातून देशभरात लाखो सेवा प्रकल्प सुरू असून कोट्यावधी जनतेशी संपर्क व सेवा या माध्यमातून केली जाते. भूकंप, पुर यासारख्या नैसर्गिक व राष्ट्रीय संकट काळी संघ स्वयंसेवक जातपात न बघता तत्परतेने सेवेसाठी धावून जातात. कोरोना काळात सुद्धा स्वयंसेवकांनी अनेकांची सेवा केली. माणसाच्या मोठेपणाचा मापदंड सांगताना त्यांनी डॉ. हेडगेवार यांनी स्वतः पेक्षा संघटनेचे नाव कसे मोठे केले याचे उदाहरण सांगितले.

मायावि युद्ध सुरू होताना दिसतेय त्यामुळे भारताचा आत्मा जागृत करण्याकरिता सज्जनशक्तीची जागरण करण्याचा व संघ कार्य वृद्धिंगत होण्याकरिता समाजाने संघाभिमुख होऊन राष्ट्र कार्याकरिता संघाला प्रत्यक्ष सहकार्य करण्याचा संकल्प या विजयादशमीच्या पावन पर्वावर करण्याचे आव्हाने त्यांनी केले.

 प्रमुख अतिथी ह.भ.प. उद्भबोध महाराज पैठणकर म्हणाले मी संघ स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध पथसंचलन व उत्सवातील विविध कार्यक्रम पाहून प्रभावित झालो आहे. संघ ही काळाची गरज असल्यामुळे मुलांवर चांगले संस्कार होण्याकरिता शिस्त लागण्याकरिता पालकांनी आपल्या मुलांना संघाच्या दैनंदिन शाखेत पाठवणे हे राष्ट्र उभारणीच्या कार्यात हातभार लावण्यासारखेच आहे.

 याप्रसंगी शहरातील बहुसंख्य नागरिक माता भगिनी यांची उपस्थिती होती. उत्सवापूर्वी स्वयंसेवकांनी नगरातून घोषानासह शानदार पथसंचलन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये