पारडगाव येथे पाण्याची भीषण टंचाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :- मानवी शरीराला जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे. पाण्याविना जीवन नाही. भर उन्हात पिण्यासाठी पाणी मिळत नसेल, तर ताहनेने जीव व्याकुळ होतो. अन् जगण्यासाठी जर पाणी नाही मिळाला तर… याची कल्पनाच न केलेली बरी. परंतु जगण्यासाठी आवश्यक असलेले पाणी भर उन्हाळ्यात नागरिकांना मिळत नसल्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.
होय, हे वास्तव आहे, ब्रम्हपुरी तालुक्यातील हाकेच्या अंतरावर असलेल्या पारडगांवचे. ब्रम्हपुरी तालुक्यातील अगदी ५ कि.मी. अंतरावर असलेल्या पारडगांव येथे पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. गावांत पाण्याची समस्या निर्माण झाल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी दारोदारी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे गावातील नागरिक एकमेकांनातुमच्या घरच्या विहीरीचा, कुपनलिकेचा पाणी नेऊ कां व बाई ? असे म्हणून विचारत असून आपल्या सोईनुसार पाणी वापरासाठी घरी आणीत आहेत. गावात पाण्याची समस्या निर्माण झाली असतांना, या समस्येकडे ग्रामपंचायत कार्यालयाचे अजिबात देणेघेणे नसल्याचे दिसून येते. गावातील प्रथम नागरिक म्हणून ज्यांची ओळख आहे, ते सरपंच सुद्धा या समस्येकडे कानाडोळा करीत असल्याचे नागरिकांत चर्चीले जात आहे.
गावातील पाण्याच्या समस्येबाबत शुक्रवारला ग्रामपंचायत कार्यालयात गावातील सुज्ञ नागरिकांनी धाव घेतली असता, तिथे ना सरपंच, ना उपसरपंच, ना ग्रामसेवक कुणीही उपस्थित नसल्याचे सुज्ञ नागरिकाने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर आमच्या प्रतिनिधींना सांगितले. ‘पाणी नाही पिण्याला, अन् ग्रामपंचायत कशाला’, असा सवाल देखील गावातील नागरिकांत उपस्थित केला जात आहे. पारगांव येथील नळ पाणीपुरवठा योजना गेल्या तिन महिन्यापासून ठप्प झाल्यामुळे, ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पारडगावची लोकसंख्या अंदाजे सुमारे १७०० च्या घरात आहे.
मात्र उन्हाळ्यात या गावात पाणीपुरवठ्याचा स्त्रोत उपलब्ध नसल्यामुळे ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये पारडगांव येथे पाण्याची उपलब्धता करण्यासाठी शासनाच्या कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला. त्यानुसार काम करण्यात आले, मात्र सर्वकाही उपलब्ध असतांना देखील, ग्रामपंचायत पारडगांव च्या उदासीनतेमुळे गावकर्यांसमोर पाणी प्रश्न निर्माण झाला आहे.
गावांना पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांची पाण्यासाठी हाल होत आहेत. ‘अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे’ या म्हणीप्रमाणे ग्रामपंचायतच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे गावकर्यांना पाणी संकटाच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरीत पाण्याची समस्या मार्गी लावावी, अशी मागणी गावातील सुज्ञ नागरिकांनी केलेली आहे.