‘कोरम्या’ नावाने झाडीपट्टीत प्रणयची नवीन ओळख
बाजारी विकलेली नार नाटकातून पाडली अभिनयची छाप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
झाडीपट्टीत दिवाळी पासून ते होळी पर्यंत चालणारी झाडीपट्टी रंगभूमीची नाटकं हा झाडीपट्टीतील लोकांच्या केवळ मनोरंजनाचा नव्हे तर जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. झाडीपट्टी रंगभूमीच्या नाटकाला झाडीपट्टीतील लोकं भरभरून प्रेम देतात. झाडीपट्टी रंगभूमीचं एखादी नाटक प्रेक्षकांना आवडलं तर त्या नाटकाला आणि त्या नाटकात अभिनय करणाऱ्या कलावंतांना झाडीपट्टीतील रसिकमायबाप अक्षरशः डोक्यावर घेतात. मग ते नाटक आणि त्या नाटकात अभिनय करणारे कलावंत नकळत अजरामर होऊन जातात.
2024 – 25 च्या झाडीपट्टी नाट्य हंगामात शिवम् थिएटर्स नागभीड – वडसाचं ‘बाजारी विकलेली नार अर्थात भाड्याची बायको’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आलं. मा. युवराज गोंगले यांच्या लेखणी आणि दिग्दर्शनातून साकारलेल्या या नाटकाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. या नाटकाच्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी तितकाच प्रतिसादही दिला. या नाटकात अभिनय करणाऱ्या कलावंतांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी दाद देत त्या कलावंतांना अक्षरशः डोक्यावर घेतलं. या वर्षी या नाटकाचे जवळपास सत्तरच्या वर प्रयोग शिवम् थिएटर्सने एका हंगामात संपूर्ण झाडीपट्टीत सादर केले.
विशेष म्हणजे ‘बाजारी विकलेली नार’ या नाटकातील मध्यवर्ती पात्र असलेल्या ‘काजळी’ (ममता गोंगले) चा भाऊ असणारा ‘कोरम्या’ हे पात्र प्रणय देवगडे याने आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयातून खूप सुंदर रित्या साकारले. नागभीड तालुक्यातील नांदेड येथे राहणाऱ्या प्रणयने या नाटकातून आपल्या अभिनयाची छाप रसिकमायबापाच्या मनावर पाडली. त्याने उत्तमरित्या साकारलेल्या या भूमिकेमुळे आज ‘कोरम्या’ ही त्याची ओळख बनली आहे. आता झाडीपट्टीतील बहुतेक लोकं त्याला ‘कोरम्या’ नावाने ओळखतात.
‘कोरम्या’ नावाने मिळालेली हि नवी ओळखं माझ्यासाठी माझ्या रसिकमायबापाकडून मिळालेलं बक्षिस आहे. यासाठी मी माझ्या रसिकमायबापाचा सदैव ऋणी राहीन असे म्हणत त्याने रसिकमायबापाचे आभार मानले आहे. या सोबतच या नाटकाचे लेखक – दिग्दर्शक मा. युवराज गोंगले यांनी कोरम्याच्या पात्रासाठी त्याची निवड केल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले आहे.