निसर्ग संवर्धन आणि निरोगी जीवनाचा संदेश देत तरुण स्केटर्सने केली सामाजिक जनजागृती

चांदा ब्लास्ट
व्याघ्रभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर शहरातील श्री शंकर क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, चंद्रपूर यांच्या वतीने दिनांक 21 मे 2025 रोजी ‘नेचर स्केटिंग सफारी’ चे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात सहभागी १० स्केटिंग खेळाडूंनी दुर्गापूर – पद्मापूर – आगरझरी ते मोहरली या ताडोबा अभयारण्याच्या क्षेत्रातील एकूण १० किलोमीटरचा निसर्गरम्य आणि जंगल रस्ता स्केटिंग करत पार केला.
या स्केटिंग सफारीचा मुख्य उद्देश निसर्ग संवर्धन, व्यायाम, खेळ व आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा संदेश देणे आणि वृक्षारोपणाबाबत जनजागृती करणे हा होता. जंगलाच्या सान्निध्यात पार पडलेल्या या सफारीमध्ये सहभागी स्केटर्सनी उत्साहपूर्वक सहभाग नोंदवून साहसी व खेळाडू वृत्तीने सदर परिसरात सामाजिक प्रबोधन घडवले.या साहसी सफारी उपक्रमात यज्ञेश प्रवीण भोंगळे (१०), देवांशी गोजे (९), अंश मल्लेलवार (६), कृष्णा कलोडे (१५), अनिश निखाडे (१३), पार्थ रामटेके (९), युवराज चौधरी, अक्षित करडभुजे (१२), माहांश राखुंडे (६). या बालखेळाडू स्केटर्स यांनी सहभाग घेतला होता या साहसी सफारीचे मार्गदर्शन राष्ट्रीय स्तरावरील नामवंत स्केटिंग प्रशिक्षक तथा तांत्रिक अधिकारी श्री. विनोद निखाडे व राष्ट्रीय रोलर हॉकी खेळाडू सौ. ईशा विनोद निखाडे यांनी केले.
खेलो इंडिया या संकल्पनेतून खेळाडूंची साहसी वृत्ती प्रदर्शित करणारा हा उपक्रम निसर्ग संवर्धनासाठी समाजाला प्रेरणा देणारा ठरला आहे.
दहा किलोमीटरचा अंतर पार करण्याकरिता सर्व पालक वर्गांनी अतिशय अमूल्य असं सहकार्य केलं.