ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

परमानंद तिराणिक यांना ‘आदिवासी कला पुरस्कार २०२५’ जाहीर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

आदिवासी संस्कृती व कलांच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या परमानंद तिराणिक यांना ‘आदिवासी कला पुरस्कार २०२५’ जाहीर झाला आहे. बहुरंग, पुणे यांच्या वतीने आयोजित १८ व्या आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सव २०२५ निमित्ताने हा मानाचा पुरस्कार देण्यात येणार आहे.

या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र असे आहे. येत्या २५ मे रोजी पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे होणाऱ्या विशेष समारंभात परमानंद तिराणिक यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. भित्तीचित्र, पेंटींग, लाकुडकाम, बांबुकाम, धातूकाम, मातीकाम यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत बहुरंग संस्थेने त्यांची निवड केली आहे.

परमानंद तिराणिक हे गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य करत असून, त्यांनी अनेक चित्रपट, चित्रमालिका, आणि नाट्यप्रयोगांतून आदिवासी संस्कृतीचे समृद्ध दर्शन घडवले आहे. त्यांच्या कलाकृतींमध्ये आदिवासी जीवनातील वास्तव, सौंदर्य आणि संघर्ष यांचे प्रभावी चित्रण दिसून येते.

बहुरंग संस्थेच्या या उपक्रमामधून आदिवासी कलाकारांचे कार्य समाजासमोर आणण्याचा आणि त्यांच्या योगदानास उचित सन्मान देण्याचा प्रयत्न केला जातो. तिराणिक यांच्या निवडीमुळे आदिवासी कलेला प्रोत्साहन मिळणार असून, हा पुरस्कार त्यांच्या कार्याचा गौरव आहे, अशी भावना विविध क्षेत्रांतून व्यक्त होत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये