कंत्राटदाराच्या हितासाठी कामगाराचा बळी घेऊ नका – खा. धानोरकर
चांदा ब्लास्ट
चंद्रपूर शहरालगत असलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठा असलेल्या चंद्रपूर महाऔष्णीक विद्युत केंद्रात काही अधिकारी कंत्राटदाराचे हित साधण्यासाठी कर्मचाऱ्यांना सावत्र वागणूक देत असल्याचा आरोप खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्य अभियंता, चंद्रपूर महाऔष्णीक विद्युत केंद्र यांना पाठविलेल्या पत्राद्वारे केला आहे.
चंद्रपूर महाऔष्णीक विद्युत केंद्रातील 28 कंत्राटी अग्निशमन कर्मचाऱ्यांना मागील 3 ते 4 महिन्यांपासून कामावरुन कमी केल्याने त्यासंदर्भात सदर कंत्राटी कर्मचाऱ्याने चंद्रपूर येथील खासदार धानोरकर यांच्या जनता दरबारात आपबीती मांडली.
अग्निशमन सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी सेवा देऊन देखील वर्षभरातून 4 महिने काम मिळत नसल्याची खंत देखील कामगारांनी व्यक्त केली. कामगारांचे नुतृत्व करणाऱ्यांना कामगारांना जाणीपुर्वक डावलेले जात असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला. या संदर्भात खासदार धानोरकर यांनी मुख्य अभियंता यांना पत्र पाठवून सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर घेण्यासंदर्भात सांगण्यात आले. त्यासोबतच, किमान वेतन व वर्षभर काम या संदर्भात देखील पत्र व्यवहार करण्यात आला.
तसेच, वारंवार कंत्राटदाराचे हित जोपासून कामगारांवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी खासदार धानोरकर यांनी पत्राद्वारे केली. या संदर्भात लवकरच मुख्य अभियंता तसेच, महाऔष्णीक विद्युत केंद्रातील विविध कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसह बैठक घेणार असल्याचे खासदार धानोरकर यांनी पत्राद्वारे सांगितले.