ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिव मंदिर शेजारी देशी दारू दुकानाचा गैरवापर

भाविक त्रस्त, स्थानिक नागरिकांचा संताप

चांदा ब्लास्ट

घुग्घुस (चंद्रपूर) : येथील प्राचीन शिव मंदिराच्या समोरील व बाजूच्या रस्त्याचा गैरवापर देशी दारू दुकानाच्या मालकांकडून होत असल्यामुळे स्थानिक नागरिकांत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. एक कंट्री लिकर शॉप (का.न.सी.एल. ../2023 ते 2024) हे देशी दारू विक्रीचे दुकान शासन मान्यतेनुसार वेगळ्या रस्त्याचा वापर करणे अपेक्षित असताना, मंदिराजवळील व तलावाला लागून असलेल्या मागच्या रस्त्याचा वापर दारू विक्रीसाठी केला जात आहे.

या प्रकारामुळे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविक, विशेषतः महिलांना, अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दारूच्या नशेत लोक मंदिर परिसरात गर्दी करतात, त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय, या कृत्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात असून सामाजिक शिस्तीचा भंग होत आहे, असे माजी उपसरपंच सुधाकर गणपत बांदुरकर यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.

शासनाच्या उत्पादन शुल्क कार्यालयाने मंजूर केलेल्या नकाशानुसार देशी दारू विक्रीसाठी समोरचा अधिकृत रस्ता असतानाही, दुकानमालक मंदिराच्या शेजारील मागच्या रस्त्याचा वापर करत असल्याचे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

याप्रकरणी संबंधित दारू दुकान व त्याच्या मालकावर त्वरित कारवाई करण्यात यावी आणि गैरप्रकार थांबवून मंदिर परिसरातील रस्ता बंद करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन उत्पादन शुल्क अधिकारी, चंद्रपूर यांना सादर करण्यात आले असून याची प्रत आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी चंद्रपूर व मुख्याधिकारी नगरपरिषद, घुग्घुस यांना पाठविण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये