ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलिसाची गळा आवळून केली हत्या ; कारमध्ये आढळला मृतदेह!

जालना जिल्हा पोलिस दलात होते कार्यरत : अज्ञातावर गुन्हा दाखल, वरिष्ठांची घटनास्थळी भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 जालना जिल्हा पोलिस दलाच्या महामार्ग विभागात कार्यरत असलेले ज्ञानेश्वर पांडुरंग म्हस्के (वय ३८, रा. गिरोली खुर्द, ता. देऊळगाव राजा) यांची अज्ञात आरोपीने गळा आवळून हत्या केल्याची घटना ३० मार्च रोजी समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यात पोलिसाच्या हत्येची सात दिवसांत दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रात्री उशिरा चार संशयितांना ताब्यात घेतले.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुढीपाडवानिमित्त मृतक ज्ञानेश्वर म्हस्के हे शनिवारी त्यांच्या मूळ गावी आले होते. काही कामानिमित्त ते गिरोलीहून देऊळगाव राजा येथे गेले; मात्र रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांच्या पत्नीने वारंवार फोन केला. प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी मोबाइल लोकेशन ट्रेस केले असता, सिंदखेडराजा रोडवरील आर. जे. इंटरनॅशनल स्कूलसमोरील वन विभागाच्या हद्दीत त्यांची कार (क्रमांक एमएच २० डीवाय ३०६३) उभी असल्याचे आढळले. घटनेची माहिती मिळाली

घटनास्थळी एसडीपीओ मनीषा कदम व इतर अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.

मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी मनीषा कदम, पोलिस निरीक्षक संतोष महल्ले, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय नरवाडे, भरत चिरडे, पोलिस उपनिरीक्षक कांचन जारवाल, कोमल शिंदे आणि पोलिस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, कारमध्ये पोलिस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला. कारचे दरवाजे आतून बंद होते आणि ड्रायव्हिंग सीटवर म्हस्के यांचा मृतदेह दिसून आला. त्यांच्या गळ्याभोवती आवळल्याच्या खुणा दिसून आल्या होत्या. त्यावरुन प्राथमिक तपासात गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे समोर आले असून, अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला.

चार संशयितांना घेतले ताब्यात….

पोलिसांनी रात्री उशीरा चार संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशी सुरू आहे. आरोपी निष्पण झाल्यानंतर हत्येचे कारण समोर येणार असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. दरम्यान खून प्रकरणाचा लवकरच उलगडा होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

फॉरेन्सिक तज्ज्ञांना केले पाचारण….

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासासाठी मार्गदर्शन केले. श्वान पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांना तपासासाठी पाचारण करण्यात आले आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

सात दिवसांत पोलिसाच्या हत्येची दुसरी घटना….

यापूर्वीही अंढेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री करणाऱ्या आरोपीचा पाठलाग करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याची २३ मार्च रोजी हत्या करण्यात आली होती. त्यानंतर सात दिवसांतच आणखी एका पोलिस कर्मचाऱ्याची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात पोलिसच सुरक्षित नसल्याचे चित्र आहे. घटनास्थळाला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देवून पुढील तपासासाठी मार्गदर्शन केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये