कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत टेकाडी येथे रब्बी हंगामपूर्व प्रशिक्षण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत तालुका कृषी अधिकारी सुशील आडे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी भद्रावती तालुक्यातील मौजा टेकाडी येथे रब्बी हंगामपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.
या प्रशिक्षणामध्ये रब्बी हंगामातील पीक लागवड, महिला शेतकरी प्रमाणपत्र तसेच राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेतकऱ्यांना जैविक व नैसर्गिक निविष्ठा निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले. बिजामृत, जीवामृत, घनजीवामृत, दशपर्णी अर्क आणि निंबोळी अर्क तयार करण्याच्या पद्धती व त्यांचा वापर याबाबत कृषी सखी यांनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला सहायक कृषी अधिकारी कपिल शंखपाळे, सहायक कृषी अधिकारी प्रदीप काळे, आत्माचे बीटीएम अमोल दहेगावकर आणि नैसर्गिक शेती मार्गदर्शक भरडे उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत नैसर्गिक शेतीचे महत्त्व, जैविक निविष्ठांची निर्मिती व वापर, उत्पादन खर्चात होणारी बचत याविषयी सविस्तर माहिती दिली.
याशिवाय पिकांवरील कीड नियंत्रणासाठी फेरोमन ट्रॅप व चिकट सापळ्यांचा वापर, कृषी विभागाच्या विविध योजना, प्रशिक्षण कार्यक्रम, अभ्यास दौरे आणि रब्बी हंगामातील शेतीशाळा याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षण कार्यक्रमाला प्रगतिशील शेतकरी, माजी सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, कृषी सखी, कृषी मित्र तसेच महिला व पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून शेतीचा उत्पादन खर्च कमी करून शाश्वत शेतीला चालना देण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण उपयुक्त ठरले.



